मुंबई : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई पाच महिन्यांपासून बंद केली असून, चालू वित्त वर्षात या नोटांची आणखी छपाई होणे शक्य नसल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी म्हटले आहे. दोन हजारांच्या नोटांऐवजी रिझर्व्ह बँकेने दोनशे रुपयांच्या नोटांसह अन्य कमी मूल्याच्या नोटांची छपाई वेगाने चालविली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.रिझर्व्ह बँकेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या ३.७ अब्ज नोटा छापलेल्या आहेत. त्यांचे एकूणदर्शनी मूल्य ७.४ निखर्व रुपये आहे. बंद करण्यात आलेल्या हजार रुपयांच्या नोटांचे अर्थव्यवस्थेतील एकूण मूल्य ६.३ अब्ज रुपये होते. त्याची भरपाई करण्यासाठी दोन हजारांच्या या नोटा छापण्यात आल्या होत्या. सूत्रांनी सांगितले की, दोन हजारांच्या नोटांची छपाई गेल्या पाच महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. सध्या ९0 टक्के छपाई पाचशेच्या नोटांची केली जात आहे. आतापर्यंत पाचशेच्या १४ अब्ज नव्या नोटा छापण्यात आल्या आहेत. ८ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आलेल्या पाचशेच्या जुन्या नोटांची संख्या १५.७ अब्ज इतकी होती. त्यांचे मूल्य ७.८५ निखर्व इतके होते. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार १४ जुलै रोजी चलनातील सर्व नोटांचे एकत्रित मूल्य १५.२२ निखर्व इतके आहे. नोटाबंदीच्या आधी ते १७.७ निखर्व इतके होते.सुरुवातीला एक अब्ज नोटा बाजारात उतरविण्यात येतील. या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडे ई-मेलच्या माध्यमातून अधिकृतरीत्या विचारणा केली होती. तथापि, रिझर्व्ह बँकेने ई-मेलला उत्तर दिले नाही. २00 रुपयांच्या नोटेची छपाई रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर येथील छापखान्यात केली जात आहे. या नोटा पुढील महिन्यात चलनात येऊ शकतात.
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:07 AM