नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गतवर्षी चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर या नोटांपैकी बहुतांश नोटा ह्या पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने आज सांगितले की, २ हजार रुपयांच्या ९७.९२ टक्के नोटा ह्या बँकांकडे परत आल्या आहेत. तर ७ हजार ४०९ कोटी रुपये मूल्य असलेल्या नोटा अद्याप परत आलेल्या नाही. मागच्या अनेक महिन्यांपासून ही स्थिती कायम आहे. यावर्षाी मार्च महिन्यात रिझर्व्ह बँकेने आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार तेव्हा ९७.६२ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या होत्या. त्यानंतर १ जुलै रोजी बँकांकडे परत आलेल्या नोटांची संख्या ९७.८७ टक्के एवढी झाली होती. त्यामुळे उरलेल्या नोटा गेल्या कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुलै महिन्यामध्ये मिळून केवळ ०.०५ टक्के एवढ्याच नोटा परत आल्या आहेत. या नोटा बँकांकडे परत का येत नाही आहेत, याबाबत सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून काहीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा चलनात असलेल्या नोटांचं एकूण मूल्य हे ३.५६ लाख कोटी एवढं होतं.
गतवर्षी मे महिन्यात २ हजार रुपयांच्या नोटा चलनामधून बाद करण्यात आल्यानंतर जून महिन्यामध्ये दोन हजार रुपयांच्या ८५ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या होता. रिझर्व्ह बँकेने लोकांना ७ ऑक्टोबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याची मुदत दिली होती. मात्र ऑक्टोबरपर्यंत केवळ ८७ टक्के नोटाच परत आल्या होत्या. त्यानंतर हळूहळू बँकांकडे परत आलेल्या नोटांची संख्या ही ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, तुमच्याकडेही २ हजार रुपयांच्या नोटा असतील, तर तुम्ही त्या रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये जमा करू शकता. आरबीआयची ही कार्यालये अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, आरबीआयची ही कार्यालये अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम ही आहेत. तसेच पोस्टाच्या माध्यमातून थेट रिझर्व्ह बँकेकडे पाठवू शकता. मात्र आता या नोटा बदलून मिळणार नाहीत. तर तुम्हाला तेवढी रक्कम बँक खात्यात जमा करून मिळेल.