प्रसाद गो. जोशी -
दोन सप्ताहांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचा संचार दिसून आला असून निर्देशांक २९ हजारांचा टप्पा ओलांडून पुढे जाण्यात यशस्वी झाला. परकीय वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली असली तरी काही आस्थापनांचे जाहीर झालेले चांगले निकाल आणि जगभरातील बाजारांमधील उत्साहाच्या वातावरणामुळे बाजार तेजीत राहिला.
मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहात तेजीचे वातावरण राहिले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहभरात २८९.८३ अंश म्हणजेच १.३१ टक्क्यांनी वाढून २९०९४.९३ अंशांवर बंद झाला. निर्देशांकाने २९ हजार अंशांची पातळी ओलांडल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीशी आश्वासक भावना निर्माण झाली आहे. मुंबई, तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील उलाढाल वाढली.
राष्ट्रीय शेअर बाजारात गेल्या सप्ताहाच्या उत्तरार्धात तेजीचा संचार झाल्याने निर्देशांक चांगला वाढला. येथील निर्देशांक (निफ्टी) ८८०० अंशांपलीकडे पोहोचला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक मागील सप्ताहापेक्षा ९३.९५ अंश म्हणजेच १.०८ टक्क्यांनी वाढून ८८०५.५० अंशांवर बंद झाला. गेल्या दोन सप्ताहात सातत्याने खाली येणारा निर्देशांक वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
गत सप्ताहात काही प्रमुख आस्थापनांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले. या निकालांमध्ये बाजाराला असलेल्या अपेक्षेपेक्षा अधिक लाभ दिसून आल्याने बाजार वाढू लागला. त्याचबरोबर बाजाराचे क्षेत्रिय निर्देशांक म्हणजेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप यामध्ये अनुक्रमे २.३८ टक्के आणि १.४६ टक्के वाढ झाली. हे दोन्ही निर्देशांक संवेदनशील आणि निफ्टी या निर्देशांकापेक्षा अधिक वेगाने वाढताना दिसत आहेत.