मुंबई - देशातील ५५ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. तर, काही कंपन्यांन जाणीवपूर्वक कंपनीतील कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत. खासगी वाहतूक क्षेत्रावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. सेवा क्षेत्रातील कंपन्यांचं सर्वात मोठं नुकसान झालं असून येथील कर्मचारी बेरोजगार झाल्याचं चित्र आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या उबेरनेही आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केलं आहे. उबेर कंपनीच्या या कारवाईनंतर सोशल मीडियातून कंपनीवर मोठी टीका होत आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा विपरीत परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं उद्योग जगतही लॉकडाऊन कालावधीत बंद होते. त्यामुळे, येथील उद्योजक, कामगार,कर्मचारी यांच्याही दैनंदिन जीवनात कोरोनामुळे विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग जगत आता सुरु करण्यात येत आहे. मात्र, अनेक कामगारांना नोकऱ्या जाण्याची भीती आहे. तर, लाखो मजूर मोठ्या शहरांमधून गावी परतल्याने कामगरांची उपासमार आणि संबंधित उद्योजकांना कामगारांची कमतरता, असा विरोधाभास दिसत आहे.
मीडियातील वृत्तानुसार उबेर कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस प्रमुख रॉफिन शेवले यांनी, एका व्हिडिओ कॉलसाठी कंपनीच्या ३७०० कर्मचाऱ्यांना एकत्र घेतले. त्यानंतर, केवळ तीन मिनिटांतच या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकल्याची घोषणाही केली. कंपनीच्या या निर्णयाचा आणि या पद्धतीचा सोशल मीडियातून समाचार घेण्यात येत आहे. मानवाधिकार संघटनेशी संबंधित नागरिकांना कंपनीच्या या निर्णयानंतर कंपनीवर कडाडून टीका केली आहे. कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशी असंवेदशीलपणे काढून टाकण्यात आले. त्यामुळे नेटीझन्सने विरोध केला आहे.
यूएस सिक्योरिटीज एंड एक्सचेंज कमीशन (एसईसी) द्वारे नुकतेच, रेग्युलेरेटरी फायलिंगमधून ३७०० कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातूनही कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत कर्मचाऱ्यांसाठी काम नसल्याचे म्हटले होते.