Join us

Ola आणि Uber चालकांना आता राईड कॅन्सल करणं महागात पडणार; दंड आकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 4:06 PM

वारंवार राईड रद्द होत असल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

उबेर आणि ओला चालकांना महाराष्ट्रात राईड रद्द करणं आता महागात पडणार आहे. महाराष्ट्र सरकारने विशेष प्रस्ताव मंजूर केला आहे. प्रस्तावानुसार, ग्राहकांसाठी अनेकदा राईड्स रद्द करणाऱ्या Uber आणि Ola च्या चालकांना आता दंड आकारण्यात येणार आहे. ड्रायव्हरने भरलेल्या दंडातून पुढील राईडमध्ये ग्राहकाला सूट मिळेल, असेही या प्रस्तावात सांगण्यात आले आहे. 

वारंवार राईड रद्द होत असल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कधीकधी ते नको त्या परिस्थितीतही अडकतात. हा नवीन प्रस्ताव आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राईड आधारित Apps बाबत ग्राहक अनेकदा तक्रार करतात. चालकांनी राईड्स रद्द करणे ही ग्राहकांची मोठी समस्या होती. अशा स्थितीत कॅबची वाट पाहत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीची भरपाई निश्चितच मिळावी, असा निर्णय परिवहन विभागाच्या समितीने घेतला. 

चालकाने राईड रद्द केल्यास प्रवाशाला 50 ते 75 रुपये दंड भरावा लागेल, असे परिवहन विभागाने सांगितले. परिवहन विभागाच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, या सूचनेची शासनाच्या मंजुरीनंतर लगेचच अंमलबजावणी केली जाईल. कॅबने बुकिंग केल्यानंतर वीस मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचावे लागेल, असंही प्रस्तावात लिहिलं आहे. यापेक्षा जास्त वेळ घेतल्यास वाहनचालकांना दंड आकारण्यात येणार आहे. 

सध्या ओला आणि उबेरचा वेटिंग टाइम पीक अवर्समध्ये 6-10 मिनिटांपर्यंत जातो. मुंबई ग्राहक पंचायतीचे वकील शिरीष देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोष्टी लागू होताच आम्ही त्याचे स्वागत करू. ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी चालकांकडून याला विरोध होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :ओलाउबरमहाराष्ट्र