सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक युको (UCO) बँकेला अदानी समूहाला कर्ज देण्यास कोणतीही अडचण नसल्याचं समोर आलं आहे. युको बँकेचे सीईओ आणि एमडी सोमा संकरा प्रसाद यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सर्व प्रकल्पांना कर्ज देण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
“याचा अर्थ अदानी समूहाचा एखादा प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या चांगला असेल तर त्याला कर्ज नाकारण्याचं कोणतंही कारण नाही,” असं सोमा संकरा प्रसाद म्हणाले. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहावरील कर्ज आणि परतफेडीच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, काही बँकांना अदानी समूहाची एक्सपोजर माहिती उघड करावी लागली. मनी कंट्रोलला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रसाद यांनी यावर भाष्य केलं.
युको बँकेचं म्हणणं काय?“जेव्हा अदानी समूहाला नवीन कर्ज देण्याची वेळ येईल तेव्हा प्रकल्पाची ताकद म्हणजेच व्यवहार्यता लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. यामध्ये, या प्रकल्पाबाबत सर्व टाय-अप झाले आहेत की नाही, कर्ज आणि इक्विटी निश्चित झाली आहे की नाही आणि या प्रकल्पासाठी कोणत्या उत्पादनाची किंवा सेवेची मागणी आहे किंवा नाही हे पाहिले जाईल,” असं त्यांनी नमूद केलं.
अदानी समुहाला दिलेल्या कर्जाविषयी बोलताना, युको बँकेचे सीईओ म्हणाले की, “समूहाचे एक्सपोजर एकूण ऍडव्हान्सच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही कर्जे युको बँकेने अदानी समुहाला पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी दिली आहेत जे पूर्ण झाले आहेत आणि त्यातून चांगली कॅशही निर्माण होत आहे.” अदानी समूहाकडे मजबूत असेट्स आहेत. हा गट नियमितपणे बँकेत कर्जाचे हप्ते भरत आहे आणि त्यामुळे एक्सपोजरची चिंता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अन्य बँकांची काय स्थिती?बँकेच्या अंडररायटिंग निकषांवर अदानी समूहाला आणखी कर्ज देण्याची तयारी असल्याची माहिती बँक ऑफ बडोदाचे एमडी आणि सीईओ संजीव चड्ढा यांनी यापूर्वी मनी कंट्रोलशी बोलकाना सांगितलं होतं. देशातील सर्वात मोठी बँक SBI चे चेअरमन दिनेश खारा यांनी ३ फेब्रुवारी रोजी माहिती दिली होती की, “अदानी समुहाचे एक्सपोजर सुमारे २७ हजार कोटी रुपये आहे, जे त्यांच्या लोन बुकच्या जवळपास ०.८ ते ०.९ टक्के आहे आणि परतफेड देखील ट्रॅकवर आहे. याचाच अर्थ अदानी समूहावरील एसबीआयच्या कर्जाबाबत काळजी करण्यासारखे काही नाही.”