मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून भारतीयांचा दबदबा असलेल्या युगांडा देशातून आता भारतासाठी थेट विमान सेवा सुरू होणार असून पहिले विमान येत्या ७ ऑक्टोबर रोजी युगांडातील अँटबी येथून मुंबईसाठी उड्डाण करणार आहे. आजच्या घडीला भारतातून युगांडा येथे जाण्यासाठी दुबई किंवा अन्य मार्गाने जावे लागते. यासाठी किमान १० तासांचा कालावधी लागतो. मात्र, आता थेट विमान सेवा सुरू होणार असल्यामुळे हा विमान प्रवास अवघ्या साडेपाच तासांत होणार आहे.
या विमान सेवेची मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली. यावेळी युगांडाच्या भारतातील उच्चायुक्त प्रा. जॉईस काकीफंडा, युगांडाचे मानद कौन्सूल मधुसूदन अगरवाल, युगांडा एअरलाइन्सचे भारतातील मुख्याधिकारी लेनी मालसी यांनी यासंदर्भात माहिती दिली. आजच्या घडीला युगांडामधील विविध शहरांत ४० हजारांपेक्षा जास्त भारतीयांचे वास्तव्य आहे. तेथील अर्थकारणामध्ये भारतीयांचा वरचष्मा आहे. दोन्ही देशांतील व्यापार उद्दीमही मोठ्या प्रमाणावर आहे.
या चार शहरांतूनही लवकरच सेवा
मात्र, तरीही आतापर्यंत या दोन्ही देशांदरम्यान थेट विमान सेवा उपलब्ध नव्हती. मानद कौन्सूल मधुसूदन अगरवाल यांनी भारत आणि युगांडा या दोन्ही देशांतील प्रमुख नेत्यांसोबत पाठपुरावा करून ही विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात मोलाची भूमिका बजावली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यांत अँटबी ते मुंबई अशी विमान सेवा आठवड्यातून तीन वेळा सुरू होणार आहे, तर आगामी काळात दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आदी शहरांतून देखील विमान सेवा सुरू होणार आहे.
या विमानसेवेकरिता कंपनीने एअरबस कंपनीचे ए ३३०-८०० हे विमान राखीव ठेवले आहे. यामध्ये बिझनेस क्लासच्या २० जागा, प्रमिअम इकॉनॉमी २८ जागा आणि इकॉनॉमी क्लासच्या २१० जागा असतील.