Join us

UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 1:48 PM

Aadhaar Card Update : जर तुम्ही गेल्या १० वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

Aadhaar Card Update : जर तुम्ही गेल्या १० वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची संधी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. जर तुम्ही आधार अपडेट केलं नसेल तर तुम्हाला १४ डिसेंबर २०२४ पर्यंत ते ऑनलाइन मोफत अपडेट करता येणार आहे.

यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, जर आपण गेल्या १० वर्षांत आपलं आधार तपशील अपडेट केले नसतील तर ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासह अपडेट करणं आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाइन आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेडलाइन १४ जून २०२४ होती, ती वाढवून १४ सप्टेंबर २०२४ करण्यात आली. आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला १४ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर आधार तपशील अपडेट करण्यासाठी शुल्क भरावं लागेल.

आधार कार्ड अपडेट का करावं?

आधार कार्ड हा आपल्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. जर तुमचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वी जारी करण्यात आलं असेल आणि अद्याप अपडेट केलं गेलं नसेल तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा नव्यानं सादर करण्याचा सल्ला दिला जातो. माहिती सुरक्षित आणि अचूक ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

आधार ऑनलाइन अपडेट कसं करावं?

  • यासाठी सर्वप्रथम यूआयडीएआयच्या www.uidai.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • My Aadhaar वर क्लिक करा आणि Update Your Aadhaar निवडा.
  • Update Aadhaar Details (Online) वर जाऊन Document Update वर क्लिक करा.
  • आपला यूआयडी नंबर, कॅप्चा कोड एन्टर करा आणि Send OTP वर क्लिक करा.
  • ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन करा.
  • जी माहिती अपेडट करायची आहे, ती निवडा आणि योग्य माहिती एन्टर करा.
  • आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि Submit वर क्लिक करा.
  • तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल ज्यातून तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकता.
  • ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु बायोमेट्रिक माहिती (उदा. आयरिस, बोटांचे ठसे) ऑनलाइन अपडेट करता येणार नाहीत.

आधार ऑफलाइन कसं अपडेट करावं?

  • यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.
  • फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जमा करा.
  • तिथे तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल आणि तुम्हाला यूआरएन दिला जाईल. आधार ऑफलाइन अपडेट करण्यासाठी मात्र शुल्क आकारलं जाईल.
टॅग्स :आधार कार्ड