Join us  

Ukraine Russia Crisis: युक्रेन-रशिया युद्धामुळे भारतात बिअर अन् इतर मद्य महागणार, जाणून घ्या का आणि कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 6:54 PM

बिअरच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण तणावाच्या पार्श्वभूमीवर बिअर निर्मितीसाठी सर्वात महत्वाचं जिन्नस असलेल्या जवाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

नवी दिल्ली-

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे परिणाम आता विविध क्षेत्रावर होत आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. तर शेअर बाजार जोरदार आपटला आहे. गुंतवणुकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. तसंच अन्नधान्याच्याही किमतीत वाढ दिसून येत आहे. यासोबतच यापुढील काळात इतर क्षेत्रावरही याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. यात बिअर आणि मद्य क्षेत्राचाही समावेश आहे. ब्रोकिंग फर्म मोतीलाल ओस्वालनं व्यक्त केलेल्या शंकेनुसार रशिया-युक्रेन युद्धामुळे बिअर कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात बिअरच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण तणावाच्या पार्श्वभूमीवर बिअर निर्मितीसाठी सर्वात महत्वाचं जिन्नस असलेल्या जवाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. किमतीत वाढ झाल्यानं ऐन उन्हाळ्याच्या काळात बिअरच्या मागणीतही वाढ होऊ शकते. 

जवाच्या किमतीत वेगानं वाढगेल्या काही महिन्यांपासून जवाच्या किमतीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. एका वर्षात जवाच्या दरात ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यात गेल्या तिमाहीत दरात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जव उत्पादक देश आहे. तर युक्रेन जगातील चौथ्या क्रमांकाचा जव उत्पादक देश आहे. सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जवाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पीक येईपर्यंत अमेरिका आणि युरोपियन निर्बंध कायम राहिल्यास किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

मद्य निर्मिती कंपन्यांवर काय होणार परिणाम?बिअर निर्मितीच्या एकूण खर्चापैकी एक तृतियांश खर्च फक्त जवाचा असतो. खरंतर भारतातही जवाचं उत्पादन होतं. परंतु, मोतीलाल ओस्वाल यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार जगभरातील किमती वाढल्यामुळे याचा परिणाम भारतातही पाहायला मिळू शकतो. कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढू शकतो. United Breweries सारख्या कंपन्या किमती वाढवू शकतात असं म्हटलं जात आहे. या कंपनीचा देशातील एकूण बिअर मार्केट पैकी ४० टक्के मार्केटवर कब्जा आहे. देशात उन्हाळ्याच्या काळात बिअरची सर्वाधिक मागणी असते अशावेळी कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर होऊ शकतो. 

टॅग्स :युक्रेन आणि रशियायुद्धव्यवसाय