नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)चा एखादा सदस्य यापुढे महिनाभर रोजगाराविना राहिला, तर त्याला पीएफमधील ७५ टक्के रक्कम काढता येईल आणि त्याचे पीएफ खातेही सुरूच राहील.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सलग एक महिन्यापर्यंत बेरोजगार असलेला ईपीएफओचा कोणताही सदस्य ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम आपल्या खात्यातून काढू शकेल. त्याने तितकी रक्कम काढून घेतली, तरी त्याचे खातेही कायमच राहील.
नव्या योजनेमध्ये ईपीएफओ सदस्य आपले पीएफ खाते सुरू ठेवू शकतो. या खात्याचा उपयोग दुसऱ्या नोकरीसाठी करणे शक्य आहे. या खात्यातून ६0 टक्के रक्कम काढण्याची आतापर्यंत मुभा होती. ती आता ७५ टक्के करण्यात आली आहे. एक्स्चेंज ट्रेडेट फंडाची मर्यादाही १ जुलै २0१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह
निधी योजना १९५२ च्या तरतुदीनुसार दोन महिन्यांपर्यंत रोजगाराविना राहिलेल्या ईपीएफओ सदस्याला स्वत:च्या खात्यातून उर्वरित
२५ टक्के रक्कम काढून खातेही बंद करता येईल.
कामगारमंत्री म्हणाले की, एक्स्चेंज ट्रेडेट फंडमध्ये (ईटीएफ) ईपीएफओची गुंतवणूक ४७४३१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हा आकडा लवकरच एक लाख कोटी रुपयांच्या घरात जाईल. या गुंतवणुकीवर १६.0७ टक्के इतका परताना मिळतो.
महिनाभर बेरोजगार व्यक्तीस पीएफमधून ७५ टक्के काढण्याची मुभा
ईपीएफओने नियमांत केला बदल; भविष्य निर्वाह निधीमधील खातेही चालू ठेवता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:21 AM2018-06-28T05:21:06+5:302018-06-28T05:21:18+5:30