Join us  

तब्बल सात हजार सुवर्ण कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Published: November 16, 2016 12:23 AM

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील सराफा बाजार ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने थंडावला आहे.

जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील सराफा बाजार ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने थंडावला आहे. बाजारात सोने व चांदीच्या खरेदीला उठाव नसल्याने, नवीन सराफ व्यावसायिकांनी नवीन दागिने तयार करणे थांबविल्याने, शहरातील सुमारे ७ हजार सुवर्ण कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.अस्सल २४ कॅरेट सोन्याच्या खरेदी-विक्रीमुळे जळगावचा सुवर्ण नगरी म्हणून गौरवाने उल्लेख होत असतो. जळगाव शहरातील ११० सुवर्णपेढ्यांच्या माध्यमातून प्रतिदिन २५ किलोच्या पुढे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी विक्री होत असते. ग्राहकांना दागिने तयार करून देण्यासाठी जळगाव शहरात ७ हजार सुवर्णकारागीर विविध भागांत वास्तव्याला आहेत.कलाकुसरच्या दागिन्यांची श्रृंखला : शहरात राजस्थानी, गुजराथी, बंगाली व स्थानिक मराठी सुवर्ण कारागीर काम करीत आहेत. एका सुवर्णपेढीवरील दागिन्यांसाठी किमान १० ते १७ कारागीर काम करीत असतात. यात बंगाली व राजस्थानी कारागीर हे कलाकुसरीचे दागिने तयार करीत असतात. दिवसाला दागिने तयार करून, एक कारागीर हा ८०० ते १२०० रुपयांपर्यंत प्रतिदिन कमाई करीत असतो. सरासरी ८०० रुपये मजुरी गृहित धरली, तरी दिवसाला ५६ लाखांची मजुरीवर उलाढाल होत आहे. सुवर्णपेढीच्या मालकाकडून ठेकेदाराला सोने दिले जाते. त्यानंतर, ठेकेदार आपल्याकडे असलेल्या कारागिरांना दागिने तयार करण्यासाठी देत असतो. सराफ बाजार थंडावल्याने कारागीर बेरोजगार : ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर, सुरुवातीचे दोन दिवस दागिने व तुकडा खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली. मात्र, शासनाने खात्यात रक्कम टाकण्याची आणि काढण्याची मर्यादा ठरविल्याने, त्याचा फटका सराफ बाजाराला बसला. सुवर्णपेढी मालकांनी जुन्या नोटा घेण्यास नकार दिल्याने, व्यवहार ठप्प झाले. बाजारातील सोने व चांदीची मागणी पैशाअभावी कमी झाली. आणखी काही दिवस हे अनिश्चित वातावरण असल्याने, व्यावसायिकांनी नवीन दागिने तयार करण्याचे काम थांबविले. त्याचा फटका सुवर्ण कारागिरांना बसला आहे.