Join us

Coronavirus: ग्रामीण बेरोजगारीमध्ये यंदा दुपटीने वाढ; दुसऱ्या लाटेचा परिणाम, कृषिक्षेत्रातही शांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 7:16 AM

कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. परिणामी खेड्यांमधील अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागावर परिणाम होत आहे. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीत आठवडाभरातच दुपटीने वाढ झाली आहे. शहरी भागातही चित्र वेगळे नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशासमोर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. 

कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. परिणामी खेड्यांमधील अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. आर्थ‍िक उलाढाल जवळपास बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढल्याचे दिसत आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीमध्ये ७.२९ टक्क्यांवरून १४.३४ टक्के अशी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरातील ग्रामीण बेरोजगारीचा हा उच्चांकी दर आहे. शहरांमध्येही वेगळी स्थ‍िती नाही. शहरातील बेरोजगारीचा दरही १४.७१ टक्क्यांवर गेला आहे. तर देशभरातील एकूण बेरोजगारीचे प्रमाण १४.४५ टक्क्यांवर आले आहे. 

देशात कोराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा श्रमिकांचा गावाकडे परतीचा ओघ दिसून आला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी ग्रामीण भागाला कोरोनाचा अधिक विळखा बसलेला आढळून आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, शेतीची कामेही थंडबस्त्यात आहेत.

‘मनरेगा’चा आधारगेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात ‘मनरेगा’ने मजुरांना आधार दिला होता. यावेळीही ‘मनरेगा’कडून मजुरांना आशा आहेत. मे महिन्यात तब्बल १.८५ कोटी जणांना ‘मनरेगा’द्वारे काम मिळाले आहे. 

टॅग्स :बेरोजगारीकोरोना वायरस बातम्या