Join us

बेरोजगारी उच्चांकावर, GDP नीचांकावर; मोदी सरकार सत्ताधीश होताच डाटा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 1:32 PM

२०१७-१८ या वित्त वर्षात भारताचा बेरोजगारीचा दर वाढून ६.१ टक्के झाला आहे. हा देशातील बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्चांक ठरला आहे. भारताचा आर्थिक वृद्धीचा दरही घसरून ५.८ टक्क्यांवर आला आहे. 

ठळक मुद्दे२०१७-१८ या वित्त वर्षात भारताचा बेरोजगारीचा दर वाढून ६.१ टक्के झाला आहे. देशातील बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्चांक ठरला आहे.भारताचा आर्थिक वृद्धीचा दरही घसरून ५.८ टक्क्यांवर आला आहे. 

नवी दिल्ली - २०१७-१८ या वित्त वर्षात भारताचा बेरोजगारीचा दर वाढून ६.१ टक्के झाला आहे. हा देशातील बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्चांक ठरला आहे. भारताचा आर्थिक वृद्धीचा दरही घसरून ५.८ टक्क्यांवर आला आहे. 

२०१७-१८ ची आकडेवारी मोदी सरकारने रोखून धरली होती. निवडणुकांत फटका बसू नये म्हणून आकडेवारी रोखण्यात आल्याचा आरोप सरकारवर करण्यात येत होता. ही आकडेवारी सरकार पुन्हा सत्तेवर येताच जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक, निवडणुकीआधीच ही आकडेवारी फुटली होती. सरकारने अधिकृतरित्या जाहीर केलेली आकडेवारी आधी फुटलेल्या आकडेवारीएवढीच असल्याचे दिसून येत आहे.

जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर वाढून ६.१ टक्के झाला असून हा ४५ वर्षांतील उच्चांक आहे. शहरी भागातील रोजगारक्षम तरुणांपैकी ७.८ टक्के तरुण बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण ५.३ टक्के आहे. अखिल भारतीय पातळीवर पुरुषांतील बेरोजगारी ६.२ टक्के, तर महिलांतील बेरोजगारी ५.७ टक्के आहे. 

वृद्धीदरात भारत पडला चीनच्या मागे

>> मार्चला संपलेल्या तिमाहीतील भारताचा आर्थिक वृद्धीचा दर घसरून ५.८ टक्के झाला आहे. भारताचा वृद्धीदर आता चीनपेक्षा कमी झाला आहे. गेल्या दीड वर्षात भारत पहिल्यांदाच चीनच्या मागे पडला आहे. त्याबरोबरच सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा भारताचा किताबही गेला आहे. 

>> मार्चच्या तिमाहीत चीनचा वृद्धीदर ६.४ टक्के राहिला. भारताचा हा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी वृद्धीदर ठरला आहे. वृद्धीदरातील या आधीचा नीचांक २०१३-१४ मध्ये नोंदला गेला होता. तेव्हा भारताचा वृद्धीदर ६.४ टक्के झाला होता. 

>> वृद्धीदरातील घसरण अपेक्षेपेक्षाही अधिक असल्याचे आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. रॉयटर्सने अर्थतज्ज्ञांची मते जाणून घेऊन केलेल्या सर्वेक्षणात मार्चला संपलेल्या तिमाहीचा वृद्धीदर ६.३ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

 

टॅग्स :व्यवसायनोकरीनरेंद्र मोदी