नवी दिल्ली : देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर वाढून ७.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी मार्चमध्ये तो ७.६० टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे ‘सीएमआयई’ या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, मार्च २०२२ मध्ये शहरी बेरोजगारीचा दर ९.२२ होता, तर ग्रामीण भागात तो ७.१८ टक्के राहिला आहे.
सीएमआयईच्या मते, मे २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर ११.८४ टक्केवर पोहोचला होता. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्या कमी होऊ लागल्यानंतर बेरोजगारीमध्ये काही प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली होती. जानेवारी २०२२ मध्ये हा दर ६.७६%वर आला होता. मात्र, फेब्रुवारीमध्ये तो पुन्हा ८.१०%वर पोहोचला. सध्या बेरोजगारीचा दर ७.८३% आहे, जो अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे.
बेरोजगारी का वाढतेय?
देशांतर्गत घटलेली मागणी आणि प्रत्येक गोष्टीची वाढलेली किंमत यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास लागत असलेला मोठा वेळ यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत नसल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
४०% शोधताहेत काम
कोरोना महामारीमध्ये कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सध्या अनेक लोक नोकरी शोधत आहेत. मार्च २०१९ मध्ये काम शोधणारे ४३.५ टक्के होते तेच प्रमाण सध्या असून, मार्च २०२२ मध्ये ३९.५ टक्के लोक काम शोधत आहेत.
सरकारने काय करावे?
सरकारने देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी तत्काळ कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
भारताचा सध्याचा ६ ते ८ टक्के विकास दर हा अर्थव्यवस्थेत पुरेशा नोकऱ्या निर्माण करण्यासाठी पुरेसा नाही.
त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा.
महागाई कमी करून रोजगाराला चालना द्यावी, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.