लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :अर्थव्यवस्था कोरोनाच्या तडाख्यातून सावरत असल्याचे चित्र असले तरीही अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील रोजगारावर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था वाढीसाठी महत्त्वपूर्ण क्षेत्रांना कोरोनाचा मोठा फटका बसला असून ते अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी २० कोटींहून अधिक लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावू शकते. एका अहवालातून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने कोरोना विषाणूच्या अनपेक्षित विनाशाबाबत एक अहवाल तयार केला आहे. कोरोना महामारीच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असली तरीही जगात रोजगार निर्मिती मंदावली आहे. १०.८ दशलक्ष कामगार गरीब झाले असून पुढील आर्थिक वर्षात २० कोटी लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावू शकते.
रोजगारातील दरी वाढणार
महामारीच्या संकटामुळे जागतिक पातळीवर रोजगारातील दरी २०२१ मध्ये ७.५ कोटींपर्यंत राहील. तर २०२२ मध्ये ती २.३ कोटी असेल. रोजगार आणि कामाचे तास कमी झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे संकट वाढणार आहे. २०१९ मध्ये १८.७ कोटी लोक बेरोजगार होते.