Join us  

चहासाठी घरी कधी येणार; मित्रांना न विचारलेलेच बरे !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:15 PM

प्रतिकूल हवामानाने उत्पादन घटले, किमती २० टक्के वाढल्या

चेन्नई : प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने चहाची बाजारातील आवक घटली आहे. परिणामी जूनमध्ये चहाच्या किमती प्रतिकिलो २० टक्के वाढून २१७.५३ रुपयांवर पोहोचल्या आहेत. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार यंदा देशाच्या एकूण चहाच्या उत्पादनाला फटका बसला. मे महिन्यात चहाचे उत्पादन ३० टक्के घटून ९.०९ कोटी किलोवर आले आहे. चहा उत्पादनाचा हा दशकभरातील नीचांक ठरला आहे. २०२३ मध्ये १३.९ कोटी किलो चहाचे उत्पादन झाले होते.

चहा उत्पादक कंपन्यांचे शेअर्स १६ टक्के वाढले

किमतीत वाढ झाल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात चहा उत्पादक कंपन्यांचे शेअर्स १६ टक्क्यांपर्यंत वाढले. हॅरिसन मल्याळम, जय श्री टी अँड इंडस्ट्रीज, मॅक्लिओड रसेल इंडिया आणि रोसेल इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे शेअर्स १५% वाढून २,३२३ रुपयांवर पोहोचले आहेत.

उत्पादन का घटले?

उष्णतेच्या लाटांमुळे चहाच्या रोपांना फटका बसला आहे. पावसामुळे चहाचे उत्पादन घटले आहे.

आसामध्ये देशाचे निम्म्याहून अधिक चहाचे उत्पादन घेतले जाते. परंतु, जुलैमध्ये पाऊस आणि नद्यांच्या पुरामुळे चहाचे मोठे नुकसान झाले आहे.

दक्षिण भारतात उन्हाळी पाऊस न पडल्याने चहा उत्पादक प्रदेशात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

निर्यातीत ३७ टक्के वाढ

२०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत चहाची निर्यात ३७ टक्के वाढल्याचे दिसून आले आहे. भारतातून प्रामुख्याने इजिप्त व इंग्लंडला तुकडे केलेल्या पानांच्या स्वरूपातील चहाची (सीटीसी) निर्यात होते. तर इराक, इराण आणि रशियाला पारंपरिक चहाची निर्यात केली जाते.केंद्र सरकारने चहा उत्पादक प्रदेशात २० कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घातल्याने पीक घटले आहे.

टॅग्स :महागाईआरोग्य