Join us  

Unilever Cancer Row: जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत! डव, TRESemme शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; अनेक उत्पादने माघारी घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 2:37 PM

डव्ह आणि ट्रीसेमीचे शाम्पू भारतातही मोठ्या प्रमाणावर विकले जातात. ही उत्पादने अमेरिकेतील प्रत्येक दुकानात वितरित करण्यात आली होती. 

हिंदुस्थान युनीलिव्हरची मूळ जगप्रसिद्ध कंपनी युनिलिव्हर अडचणीत आली आहे. या कंपनीच्या शाम्पूच्या उत्पादनांपासून कॅन्सरचा धोका असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या शॅम्पू ब्रँड्समध्ये कॅन्सरचा धोका असलेले रसायन सापडले आहे. यामुळे कंपनीने अनेक प्रकारचे शाम्पू अमेरिकी बाजारातून माघारी बोलावले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सननंतर अशा प्रकारचा फटका बसलेली ही दुसरी अमेरिकी कंपनी आहे. 

युनिलिव्हर (Unilever) ची उत्पादने जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. कंपनीने Dove, Nexxus, Suave, TIGI आणि TRESemmé एअरसोल ड्राय शाम्पू माघारी घेतले आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या शाम्पूमध्ये बेंझीन (benzene) हे कॅन्सरची उत्पत्ती करणारे रसायन सापडले आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) नुसार ही उत्पादने ऑक्टोबर २०२१ च्या पूर्वी बनविण्यात आली होती. ही उत्पादने अमेरिकेतील प्रत्येक दुकानात वितरित करण्यात आली होती. 

डव्ह आणि ट्रीसेमीचे शाम्पू भारतातही मोठ्या प्रमाणावर विकले जातात. यामध्ये Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut, Nexxus Dry Shampoo Refreshing Mist आणि Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive या शाम्पूंचा समावेश आहे. बेंझिनमुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. बेंझिन मानवी शरीरात अनेक प्रकारे प्रवेश करू शकते. ते वासाने, तोंडातून आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकते. त्यामुळे ल्युकेमिया आणि रक्ताचा कर्करोग होऊ शकतो. लोकांनी अशा उत्पादनांचा वापर करणे थांबवावे आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी UnileverRecall.com च्या वेबसाइटवर दावा करावा, असे एफडीएने म्हटले आहे. या साऱ्या प्रकरणावर युनिलिव्हरकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाहीय. 

पर्सनल केअर उत्पादनांमध्ये एरोसोलच्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. दीड वर्षापूर्वी बाजारातून अनेक एरोसोल सनस्क्रीन परत मागवण्यात आले होते. जॉन्सन अँड जॉन्सनचे न्यूट्रोजेना, एजवेल पर्सनल केअर कं. व कॉपरटोन आदी उत्पादने होती. गेल्या वर्षी प्रॉक्टर अँड गॅम्बलने ३० हून अधिक एरोसोल स्प्रे हेअरकेअर उत्पादने देखील परत मागवली होती. यामध्ये ड्राय शॅम्पू आणि ड्राय कंडिशनरचा समावेश होता. 

टॅग्स :कर्करोगअमेरिका