Join us

Union Bank On MTNL : 'या' सरकारी बँकेनं MTNL ची सर्व खाती गोठवली; यामागे आहे मोठं कारण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:42 AM

Union Bank On MTNL : सरकारी दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात एमटीएनएलची अवस्था सातत्यानं ढासळत चालली आहे. आता एका बँकेनं नुकतीच त्यांची सर्व खाती गोठवली आहेत.

Union Bank On MTNL : सरकारी दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात एमटीएनएलची अवस्था सातत्यानं ढासळत चालली आहे. आता एका बँकेनं नुकतीच त्यांची सर्व खाती गोठवली आहेत. एमटीएनएल सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. 

युनियन बँक ऑफ इंडियानं एमटीएनएलची सर्व खाती गोठवली आहेत. कंपनीनं थकबाकी न भरल्यानं बँकेनं हे पाऊल उचललंय. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडनंही (एमटीएनएल) आपली खाती गोठवल्याची माहिती शेअर बाजाराला दिली. कर्जाची परतफेड न केल्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियानं आपली सर्व खाती गोठवली आहेत, असं कंपनीचं म्हणणे आहे. बँकेनं २१ ऑगस्ट रोजी कंपनीची खाती गोठवल्याची माहिती दिली.

काय म्हटलंय एमटीएनएलनं?

टेलिकॉम कंपनीच्या म्हणण्यानुसार युनियन बँक ऑफ इंडियानं त्यांच्या लोन अकाऊंटला एनपीए कॅटेगरीमध्ये टाकलं आहे. यासोबत त्यांची सर्व खाती आपोआप गोठवली गेली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला एमटीएनएलनं ४२२.०५ कोटी रुपयांचं बँकेची कर्जाची रक्कम डिफॉल्ट केल्याची माहिती दिली होती.

एमटीएनएलवर किती कर्ज?

युनियन बँक ऑफ इंडियाचे १५५.७६ कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे १४०.३७ कोटी रुपये, बँक ऑफ इंडियाचे ४०.३३ कोटी रुपये, पंजाब अँड सिंध बँकेचे ४०.०१ कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे ४१.५४ कोटी रुपये आणि युको बँकेला ४.०४ कोटी रुपये भरता आले नसल्याची माहिती एमटीएनएलनं दिली होती. टेलिकॉम कंपनीने या बँकांकडून एकूण ५,५७३.५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. तोट्यात चाललेल्या टेलिकॉम कंपनीनं बँका आणि वित्तीय संस्थांकडून एकूण ७,८७३.५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतलं असून कंपनीवरील एकूण कर्ज ३१,९४४.५१ कोटी रुपये आहे.

टॅग्स :एमटीएनएलसरकार