नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील सीमाशुल्क साडेबारा टक्क्यांनी वाढविण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रती दहा ग्राम आठशे रुपयांपर्यंत सोने महागले आहे. गुरुवारी मुंबईत सोन्याचा १0 ग्रॅमचा दर जो ३५ हजार ८0 रुपये होता, तो बजेटनंतर लगेचच ३५ हजार ८६५ रुपयांवर गेला.सोने महागण्याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. पूर्वी १० टक्के सीमाशुल्क आकारले जायचे. आता यात अडीच टक्के वाढ झाली आहे. शिवाय ३ टक्के जीएसटी अनिवार्य आहे. त्यामुळे एकूण १५.५ टक्के सीमा शुल्क व्यापाऱ्यांना भरावा लागेल. दिल्लीच्या करोलबाग्मधील सोन्याचे व्यापारी विशाल पाटील यांनी अनाराजी व्यक्त करीत खरेदी-विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. लाजपतनगरचे सराफा व्यापारी गोरख पाटील यांनी सीमाशुल्क वाढल्यामुळे तस्करीला प्रोत्साहन मिळेल, असे नमूद केले. ज्या देशांमध्ये सोने स्वस्त आहे, तेथून मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सोन्याची तस्करी होईल. अशाने महसुलात वाढ होण्याऐवजी घट होण्याचीच शक्यता अधिक आहे, असे ते म्हणाले.
Union Budget 2019: सोने महागले ८०० रूपयांनी, कस्टम डयुटी वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 6:01 AM