नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. शेत मालाची खरेदी-विक्री प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आता राष्ट्रीय कृषी बाजाराशी आणखी एक हजार बाजार समित्या जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
E-NAM योजनेअंतर्गत शेतकरी जवळील बाजारातून आपले उत्पादन ऑनलाइन माध्यमातून विकू शकतो. तसेच व्यापारी कुठूनही त्यांच्या उत्पादनासाठी पैसे पाठवू शकतो. गेल्या वर्षी या योजनेत एक हजार बाजार समित्या जोडण्यात आल्या होत्या. या योजनेची सुरुवात झाली, तेव्हा केवळ २१ बाजार समित्यांचा यामध्ये सहभाग होता. मात्र, आता 'ई-एनएएम'मध्ये १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ एप्रिल २०१६ रोजी राष्ट्रीय कृषी बाजार अखिल भारतीय इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल (ई-नाम) हे सुरू करण्यात आले होते.
Budget 2021: तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकार काय काय विकणार?; पाहा संपूर्ण यादी
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन बाजारपेठ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ऑनलाइन बाजारपेठ संकल्पना राबवली. यानुसार ई-नाम ही योजना अमलात आणण्यात आली. या योजनेचा आढावा घेतल्यास ती शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे. ई-नाम हे एक इलेक्ट्रॉनिक शेती पोर्टल आहे. हे पोर्टल भारतातील कृषी उत्पादन विपणन समितीला नेटवर्कद्वारे जोडण्याचे काम करते. कृषी उत्पादनांसाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेतून होणारे फायदे लक्षात घेऊन शेतकरी त्यात अधिकच गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ई-नाम ही योजना नेमकी काय आहे?
शेतकऱ्यांच्या पिकांची ऑनलाइन माध्यमातून विक्री व्हावी, यासाठी देशभरात कृषी बाजार समित्या (ई-मंडी) सुरू करण्यात आल्या. इंटरनेटच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांत असलेल्या कृषी उपज बाजार समितीच्या नावाखाली देशांतील ५८५ बाजार समित्या जोडल्या गेल्या. संपूर्ण देश हा बाजारपेठ बनला पाहिजे, असे याचे लक्ष्य आहे. बिहारमधील एखाद्या शेतकऱ्याला आपले उत्पादन दिल्लीत विकायचे असेल तर शेतीमाल घेऊन जाणे आणि त्यांची विक्री करणे या ई-नाम योजनेमुळे सोपे झाले आहे. यानुसार, शेतकरी कुठल्याही वस्तू चांगल्या किमतीवर नोंदणी करून विक्री करू शकतात. शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामधील दलालाची मध्यस्थी ई-नामामुळे संपुष्टात आली आहे. केवळ शेतकरीच नाही तर ग्राहकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे.
ई-नामशी कसे जोडले जाता येईल?
ई-नामशी जोडले जाण्याची एकदम सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम सरकारने जारी केलेल्या वेबसाइट www.enam.gov.in वर जावे. त्यानंतर ही नोंदणीसाठी अर्ज करावा. तेथे एक शेतकरी पर्याय दिसेल. मग आपल्याला आपला ईमेल आयडी द्यावा. यात आपल्याला ईमेलद्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. यानंतर आपणास ई-मेल आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल. आपल्या केवायसी कागदपत्रांद्वारे www.enam.gov.in या वेबसाइटवर अर्ज करून आपल्या डॅशबोर्डवर नोंदणी करू शकता. एपीएमसीने आपले केवायसी मंजूर केल्यावर आपण आपला व्यवसाय सुरू करण्यास सक्षम असाल. अधिक माहितीसाठी आपण https://enam.gov.in/web/resources/reg नाव- मार्गदर्शन पुस्तिका याची माहिती मिळवू शकता.