नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल पेमेंट्स वाढवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून देशातील ७५ जिल्ह्यात ७५ डिजिटल बँका स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेंतर्गत येणार असून, पोस्ट ऑफीसमधूनही आता ऑनलाईन ट्रान्सफर करता येणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये ७५ डिजिटल बँका स्थापन करण्यात येतील. व्यावसायिक बँकांकडून या बँका सुरू केल्या जातील. या बँकांच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटसचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच देशातील सर्व पोस्ट ऑफिसना कोअर बँकिंग सिस्टिमशी जोडले जाईल. तसेच पोस्टामधून आता ऑनलाईन ट्रान्सफर करता येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्र्यांनी पूर्वोत्तर भागाच्या विकासासाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. तिला पीएम डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह असे नाव देण्यात आले आहे. तसेच उत्तरेकडील सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी व्हायब्रेंट व्हिलेज प्रोग्रॅम सुरू करण्यात येणार आहे.