यंदाच्या अर्थसंकल्पात १,४०,३६७.१३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रेल्वे वाहतुकीला बूस्टर डोस दिला आहे. प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेंतर्गत रेल्वेला विशेष प्राधान्य मिळाल्याने रेल्वे प्रवास आणि माला वाहतुकीला मोठी चालना मिळणार नाहे.
४०० वंदे भारत ट्रेन
येत्या तीन वर्षांत देशांतर्गत ४०० वंदे-भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या योजनेंतर्गत जम्मू ते दिल्ली आणि दिल्ली-वाराणशी या स्पेशल ट्रेन्स यापूर्वीच सुरू झाल्या आहेत.
१०० कार्गो टर्मिनल्स
प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेंतर्गत १०० कार्गो टर्मिनल्स सुरू करण्यात येणार असून, त्याचा फायदा स्थानिक शेतकरी, उद्योजक आणि व्यावसायिकांना होईल.
वन स्टेशन, वन प्रॉडक्ट
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ‘वन स्टेशन-वन प्रॉडक्ट’ अशी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून याचा फायदा स्थानिक शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योजकांना होणार आहे. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी यापूर्वीच ‘किसान ट्रेन’ सुरू करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा लाखो शेतकऱ्यांनी घेतला आहे.
आत्मनिर्भर भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत २ हजार किमी रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. या तरतुदीमुळे अत्याधुनिक, गतिमान रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.
विद्युतीकरण आणि दुपदरीकरण
देशातील सर्व ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण आणि जिथे एकल ट्रॅक आहे, अशा मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. २०२३ अखेरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
मेट्रोचे जाळे
महानगरीय वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मोठ्या व मध्यम शहरांत मेट्रो रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
रेल्वे-रस्ते वाहतूक मार्ग
देशांतर्गत दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचे एकत्रीकरण करण्याची योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. त्यानुसार जिथे शक्य असेल, तिथे राष्ट्रीय महामार्गावर रेल्वेमार्ग उभारण्यात येईल. जेणेकरून भूसंपादनाचा वेळ आणि खर्चही वाचू शकेल.