नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 या वर्षाच्या अर्थसंकल्पात (Union Budget) बळीराजासाठी काही घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार काय घोषणा करते, याची उत्सुकता सर्वांना होती. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकराने केला आहे.
देशातील राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक कोर्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच, झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यात येणार आहे. शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल. नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
याचबरोबर, जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच, केंद्र सरकारकडून गहू आणि धानाची विक्रमी खरेदी केली जाणार आहे. किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी केली जाणर आहे. गंगा नदीच्या पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविली जाईल. गंगा कॉरिडॉरच्या आसपास नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल. याशिवाय, गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल, असे निर्मला सितारामन यांनी सांगितले.