अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोनाच्या महासाथीमुळे ज्यांना नुकसान झालं आहे, त्यांच्याप्रती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवेदना व्यक्त केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प मांडताना पीएम आवास योजनेबाबत (PM Awas Yojana) मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी पीएम आवास योजनेअंतर्गत ८० लाख घरांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती दिली.
"पीएम आवास योजनेअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८० लाख घरं उपलब्ध करुन दिली जातील. यासाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे," अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. यासाठी राज्य सरकारांसोबत मिळून काम केलं जाईल. जेणेकरुन गरजवंतांना घरं मिळतील, असंही त्या म्हणाल्या.
महिला, मुलांसाठी विशेष योजना
यावेळी सरकारकडून मिशन शक्ती, मिशन वास्तल्य, पोषण २.० लाँच करण्यात आल्या. याच्या माध्यमातून महिला व बालकांच्या योजना कार्यक्षम पद्धतीने पोहचवता येतील. या माध्यमातून २ अंगणवाड्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. 'हर घर नल से जल' या योजनेतून ५.५ कोटी घरांना पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
फळ, भाज्यांसाठी योजना
फळे आणि भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी सरकार सर्वसमावेशक पॅकेज लागू करणार आहे. मध्यम आणि लघु उद्योगांना वाव दिला जाईल. बी टू बी सेवांसाठी सरकार अनेक गोष्टींना प्रोत्साहन देईल. एमएसएमईच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी इमर्जन्सी क्रेडिट लाइनला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं