Union Budget 2022 Nirmala Sitharaman: अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोनाच्या महासाथीमुळे ज्यांना नुकसान झालं आहे, त्यांच्याप्रती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवेदना व्यक्त केल्या. देश कोरोनाच्या लाटेतून जात आहे. परंतु कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत. सर्वांचं कल्याण हे आमचं ध्येय आहे. याशिवाय खासगी गुंतवणूक वाढवण्याचंही लक्ष्य ठेवण्यातआलं आहे. गरीबांची क्षमता वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. या अर्थसंकल्पानं पुढील २५ वर्षांचा पाया रचला जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या कारकीर्दीतील चौथे आणि कोरोना संकटानंतरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडला. कोरोना संकटामुळे यंदाही हा अर्थसंकल्प पेपरलेस अशा प्रकारचा होता. हे बजेट सर्वांना डिजिटली वाचता यावं यासाठी सरकारनं एक अॅपही तयार केलं होतं. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका कमी आहे, तरी यामुळे आर्थिक बाबींमध्ये थोडी बाधा आली आहे. आपण आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपली अर्थव्यवस्थाही तेजीनं वाढत आहे. तसंच भारत आपली विकास यात्रा कायम ठेवेल असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पामुळे भारताला पुढील २५ वर्षांचा पाया रचण्यासाठी मदत होईल. पुढील आर्थिक वर्षात ग्रोथ ९.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. ही मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सर्वाधिक वाढ असल्याची माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली.