- गौरीशंकर घाळे
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाजूने ठरलेल्या प्रतिक्रिया येतात. तरतुदींचा आधार घेत अर्थसंकल्पाची भलामण केली जाते. असे असताना सध्या केवळ ‘थँक यू, मोदीजी’ इतकीच धून भाजपचे खासदार, आमदार वाजवताना दिसत आहेत. मुंबई किंवा महाराष्ट्रासाठीच्या तरतुदींची माहिती ठामपणे एकही नेता सांगताना दिसत नाही.
भाजपचे मुंबईतून तीन खासदार आहेत. यापैकी कोणीही मुंबई किंवा मुंबई महानगर क्षेत्रात या अर्थसंकल्पाने काय दिले, याचे एकही ट्विट अथवा पोस्ट केलेली नाही. खा. मनोज कोटक यांनी केंद्र सरकारने विविध विभागांच्या अनुषंगाने केलेल्या तरतुदी आणि निर्णयांची माहिती दिली. मात्र, मुंबईशी संबंधित माहिती त्यात दिसत नाही. खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी नगरविकास आणि शिक्षण या क्षेत्रात मोठ्या सुधारणांचे सुतोवाच करत अर्थसंकल्प त्यादिशेने असल्याचे नमूद केले. मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच्या नेमक्या योजना आणि त्यांचा तपशील एकाही नेत्याच्या सोशल मीडियावर दिसत नाही. केंद्राच्या विविध योजनांमधून राज्यांमध्ये खर्च होतच असतो. कोविड काळात मास्कपासून ऑक्सिजन पर्यंतचा खर्च केंद्राने उचलला. अन्नधान्यही केंद्रानेच दिले. या गोष्टी विरोधक कशाला सांगतील? हे तर भाजपच्या खासदारांनी सांगायला हवे; पण तेदेखील हे करताना दिसत नाहीत. आताही भाजप खासदारांनी मुंबईसाठी काय मिळाले हे सांगायला हवे होते; पण त्यांना याची योग्य मांडणी करावी, असे वाटत नाही, अशी खंत मुंबई भाजपच्या एक ज्येष्ठ आमदारांनी व्यक्त केली.
मुंबईकरांना भोपळा मिळाला हे सांगायला भाजप नेत्यांच्या या प्रतिक्रिया पुरेशा आहेत.
सर्वसामान्य व मध्यमवर्गास दिलासा देणारा, पायाभूत सुविधांचे जाळे देशभर विकसित करणारा, महिलांना आत्मनिर्भर करणारा, देशात स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठ निर्माण करून रोजगार मिळवून देणारा हा चांगला अर्थसंकल्प आहे.
- गोपाळ शेट्टी, खासदार, उत्तर मुंबई
उत्कृष्ट अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक अभिनंदन. मानवी विकासावर जोर देतानाच एकंदर अर्थव्यवस्थेला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. राहणीमान सुसह्य करण्याच्या दृष्टीने खरी वाटचाल.
- खा. विनय सहस्त्रबुद्धे, राज्यसभा
आत्मनिर्भर भारताचा हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने भारतीय युवकांच्या आकांक्षांना पंख देणारा असून, भारतीयांच्या आरोग्याची काळजी घेणारा आहे. असा प्रगतिशील अर्थसंकल्प दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना धन्यवाद.
- पूनम महाजन, खासदार, उत्तर मध्य मुंबई
नवीन भारताच्या अमृतकाळाची ब्लू प्रिंट मांडल्याबद्दल अभिनंदन. हा अर्थसंकल्प विविध क्षेत्रांमध्ये वाढ करणारा आहे. गुंतवणूकदार, उद्योग व पायाभूत सुविधांसाठी अनेक सकारात्मक बदल घडवणारा आहे.
- मनोज कोटक, खासदार, ईशान्य मुंबई