Union Budget 2023-24: आर्थिक विकास वाढीचा दर ७ टक्के इतका राहील. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात जगाने भारताची ताकद मान्य केली. जी-२० अध्यक्षपद मिळणे ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद करत केंद्र सरकारची सर्वांगीण, सर्वसमावेश आणि शाश्वत विकासाची त्रिसूत्री जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पूर्णवेळ असलेला शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. रेल्वे, रस्ते, पायाभूत सुविधा, शेती, ग्रामीण विकास, शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांवर अधिक भर केंद्र सरकारचा राहणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
देशभरात ४७.८ कोटी जनधन बँक खाती उघडली गेली. दरडोई उत्पनात दुपटीने वाढ झाली आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक पातळीवरील आव्हानांचा विचार करता आम्ही लोकाभिमुख अजेंड्यावर काम करतोय, असे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सर्वसमावेश विकासाची केंद्र सरकारची त्रिसुत्री काय असेल, याबाबत संसदेत माहिती दिली.
सर्वांगीण शाश्वत विकासाची मोदी सरकारची त्रिसुत्री
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या विकासाची दिशा स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारच्या आर्थिक अजेंड्यासाठी तीन व्हिजन समोर असल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या. यामध्ये नागरिकांना संधी उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मितीत वाढ आणि चालना देणे, आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणे या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आगामी काळात केंद्र सरकारचा भर राहणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या ९ वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार जगातील दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. आम्ही अनेक शाश्वत विकासांच्या ध्येयांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. अनेक योजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीमुळे सर्वसमावेशक विकास झाला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"