Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना थोडा दिलासा देणाऱ्या काही घोषणाही केल्या. पंतप्रधान आवास योजनेचं बजेट वाढवण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. तसंच त्यांनी पॅन कार्ड धारकांसाठी दिलासा देणारी घोषणा केली. पॅन कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जाऊ शकतो, असं त्यांनी नमूद केलं.
परमनंट अकाउंट नंबर (PAN) आता सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल सिस्टमसाठी एक सामान्य ओळखपत्र म्हणून वापरता येईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. पंतप्रधान आवास योजनेचा खर्च ६६ टक्क्यांनी वाढवून ७९००० कोटी रुपये केला जात आहे. पुढील तीन वर्षांमध्ये सरकार आदिवासी विद्यार्थ्यांना समर्थन देणाऱ्या ७४० एकलव्य मॉडेल शाळांसाठी ३८ हजार शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. देशात ५० एअरपोर्ट्स, हेलिपोर्ट्स, वॉटर एअरोड्रॉम्स आणि ॲडव्हान्स्ड लँडिंग झोन्स पुनरुज्जीवीत केली जातील. खासगी स्त्रोतांकडून १५ हजार कोटी रुपयांसह ७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह स्टील, बंदरे, कोळसा, अन्नधान्य आणि खते क्षेत्रासाठी १०० परिवहन पायाभूत योजनांची ओळख पटवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
“पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य २० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल. मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. त्याचबरोबर शेतीशी संबंधित स्टार्टअप्सनाही प्राधान्य दिले जाईल. तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी ॲअग्रीकल्चर एक्सीलरेटर फंडाची स्थापना केली जाईल,” असं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या.
अर्थसंकल्पाचे सात ‘आधार’
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाचे सात आधार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. त्यांचा उल्लेख सप्तर्षी असा करण्यात आला. त्यामध्ये समावेशक विकास, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतेचा विस्तार, हरित विकास, युवा शक्ती आणि आर्थिक क्षेत्र यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सरकारी फंडिंग आणि आर्थिक क्षेत्राकडून मदत घेतली जाणार आहे. ‘जनभागीदारी’साठी सबका साथ, सबका प्रयास महत्त्वाचा असल्याचं सीतारामन म्हणाल्या.