Join us

Union Budget 2024 Live Updates : टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, अतिशय जुनी प्रकरणं मागे घेणार - अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 8:19 AM

Live Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात ...

01 Feb, 24 11:46 AM

जुलैमध्ये विकसित भारताचा रोडमॅप सादर करणार

आमचं सरकार पर्यटनावर काम करत आहे. परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन दिलं जात आहे. पर्यटन केंद्रांचा विकास केला जात आहे. जुलैमध्ये आमचं सरकार विकसित भारताचा रोडमॅप सादर करेल.

01 Feb, 24 11:44 AM

"वंदे भारतसाठी ४० हजार डबे तयार केले जातायत"

विमानतळांचा विस्तार केला जात आहे. आता वंदे भारतचाही विस्तार होतोय. वंदे भारतसाठी ४० हजार डबे तयार केले जात आहे. देशात ५१७ हवाई मार्द विकसित केले आहे. ३ नवे रेल कॉरिडोअर तयार केले जातील. यामुळे आर्थिक विकास होईल. प्रवाशांच्या सुविधाही वाढवल्या जातील.

01 Feb, 24 11:57 AM

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही

निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणादरम्यान इन्कम टॅक्सबाबत कोणीही नवीन घोषणा केली नाही. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
 

01 Feb, 24 11:55 AM

गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही करदात्यांसाठी मोठं काम

गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही करदात्यांसाठी मोठं काम केलं आहे. फाईल रिटर्नची व्यवस्थाही अधिक सोपी करण्यात आली आहे. आता रिफंड मिळण्यात खूप कमी वेळ लागतो. 

01 Feb, 24 11:54 AM

जीएसटीमुळे इंडस्ट्रीवरील कंप्लायन्सचं ओझं कमी झालं

अर्थमंत्र्यांनी भाषणादरम्यान करदात्यांचे आभार मानत सरकारनं कर दरात कपात केल्याचं म्हटलं. तसंच सात लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कर नसल्याचंही नमूद केलं. गेल्या ५ वर्षांमध्ये करदात्यांच्या सुविधा वाढवण्यात आल्या. जीएसटीमुळे इंडस्ट्रीवरील कंप्लायन्सचं ओझं कमी झालं आहे.

01 Feb, 24 11:46 AM

"२०४७ पर्यंत विकसित भारत बनेल" 

२०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचं सरकार पुढे जात आहे. चार वर्षांमध्ये तेजीनं आर्थिक विकास झाला आहे. मत्स्य उत्पादन दुप्पट झालं आहे. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनत आहे.

 

01 Feb, 24 11:41 AM

१ कोटी महिला लखपती दीदी बनल्या, आता ३ कोटींचं लक्ष्य - अर्थमंत्री

देशातील एक कोटींपेक्षा अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत. याचं ध्येय आता २ कोटींवरून वाढवून ३ कोटी करण्यात आलंय. ९ कोटी महिलांच्या जीवनात बदल झाले आहेत.

 

01 Feb, 24 11:39 AM

"आंगणवाडी कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारतची सुविधा"

सर्वायकल कॅन्सरचा सामना करण्यासाठी आमच्या सरकारनं लसीकरण आणलं आहे. मुलींचा यापासून बचाव करण्यासाठी मोफत लसीकरण केलं जाईल. देशातील मेडिकल कॉलेजमधील सुविधा वाढतील. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत सर्व आशा कर्मचारी आणि आंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात येणार आहेत.
 

01 Feb, 24 11:36 AM

५ कोटी लोकांना घरीबी रेषेच्या बाहेर आणलं - निर्मला सीतारामन

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तेजीनं काम केलं जाणार आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार भर देत आहे. देशातील बाजारांना eNAM शी जोडलं जाणार. आमच्या सरकारनं २५ कोटी लोकांना गरीही रेषेच्या बाहेर काढलं आहे.

 

01 Feb, 24 11:31 AM

१ कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे ३०० युनिट वीज मोफत देणार - निर्मला सीतारामन

सर्वसमावेशी विकासाला चालणारं आमचं सरकार आहे. प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. अनेक आव्हानांनंतरही ग्रामीण क्षेत्रात ३ कोटी घरं उभारण्याचं लक्ष्य पूर्ण केलं. पुढील ५ वर्षांत २ कोटी घरं उभारली जाणार. देशातील १ कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे ३०० युनिट वीज मोफत देणार.

01 Feb, 24 11:27 AM

५ वर्षात गरीबांसाठी २ कोटी घरं उभारणार - अर्थमंत्री

रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म मिशनवर काम सुरू. एमएसएमईसाठी व्यवहार सोपं करण्यावर काम सुरु आहे. पुढील ५ वर्षात गरीबांसाठी ५ कोटी घरं उभारली जातील.  

01 Feb, 24 11:25 AM

"एक कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलं"

आमचं सरकार सामान्य लोकांच्या जीवनात बदल आणण्याची गॅरंटी गेत आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्राच्या विकासाच्या संकल्पासह काम करत आहोत. एक कोटी तरुणांना प्रशिक्षण दिलं आहे.

01 Feb, 24 11:21 AM

१० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले - अर्थमंत्री

१० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. २०१४ मध्ये देश अनेक आव्हानांचा सामना करत होता. सरकारनं त्या आव्हानांचा सामना केला आणि त्यात सुधारणा केल्या. जनतेसाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.

01 Feb, 24 11:19 AM

११.८ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ : अर्थमंत्री

११.८ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला. पीएम मुद्रा अंतर्गत २२.५ लाख कोटींचं कर्ज देण्यात आलं.  वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग वाढला. १० वर्षांमध्ये उच्च शिक्षणात महिलांची भागीदारी २८ टक्क्यांनी वाढली.

01 Feb, 24 11:15 AM

४ कोटी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला - अर्थमंत्री

४ कोटी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. गरीब, महिला, तरुण, अन्नदात्यांवर फोकस. स्वनिधी योजनेद्वारे २.३ लाख स्ट्रीट वेंडर्सना कर्ज देण्यात आलं. ३० कोटींचं मुद्रा लोन महिला उद्योजकांना देण्यात आलं.

01 Feb, 24 11:13 AM

"जनतेच्या हितासाठी काम करण्यास सुरु केलं"

जनतेच्या हितासाठी काम करण्यास सुरु केलं आहे. जनतेला अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनतेनं आम्हाला दुसऱ्यांदा संधी दिली. आम्ही व्यापक विकासाचं ध्येय ठेवलं.

01 Feb, 24 11:11 AM

गरीब कल्याण देश कल्याण हा सरकारचा विचार - अर्थमंत्री

सर्व गरजूंना सरकारी योजनांचा लाभ देण्यावर जोर देण्यात आला. सर्वांगिण, सर्वसमावेशी, सर्वस्पर्शी यावर काम सुरू. गरीब कल्याण देश कल्याण हा सरकारचा विचार - अर्थमंत्री

01 Feb, 24 11:08 AM

ग्रामीण अर्थव्यवस्थेकडेही लक्ष - निर्मला सीतारामन

सर्वांसाठी  घर, सर्वांसाठी जल, सर्वांसाठी वीज यावर जोर. ८० कोटी लोकांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी एमएसपी वाढवण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेकडेही लक्ष.

01 Feb, 24 11:05 AM

'गेल्या १० वर्षात अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम'

गेल्या १० वर्षात अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम.  देशाला नवी दिशा, नवी आशा मिळाली. सबका साथ सबका विकासच्या दृष्टीनं काम सुरू - अर्थमंत्री

01 Feb, 24 11:04 AM

सबका साथ सबका विकासवर सरकारचं काम सुरु - अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाला सुरुवात. सबका साथ सबका विकासवर सरकारचं काम सुरु.

01 Feb, 24 10:51 AM

बजेटसोबत ताळमेळ बसवू शकेल का शेअर बाजार?

केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प पाहता कोणतीही नकारात्मक बातमी येण्याची शक्यता नाही, पण बाजाराच्या दृष्टिकोनातून फारसा लोकप्रिय अर्थसंकल्पही बाजाराला आवडणार नाही. करदात्यांना कर आघाडीवर थोडा दिलासा मिळाला तर बाजार त्याचे स्वागत करेल, पण सरकारनं वित्तीय तूट आघाडीवर शिथिलता आणली तर बाजाराला ते बाजारासाठी नकारात्मक ठरू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

01 Feb, 24 10:46 AM

बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतिम बजेट सादर करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेलं हे अंतरिम बजेट असणार आहे. या बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. अपेक्षेप्रमाणे आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

01 Feb, 24 10:39 AM

यावेळी राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांचं तोंड गोड केलं

अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांचं तोंड गोड केलं.
 

 

01 Feb, 24 10:30 AM

अर्थसंकल्पाला राष्ट्रपतींची मंजुरी

अर्थसंकल्पाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुकी मिळाली आहे. आता मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून त्यात मंजुरी मिळणं बाकी आहे. यानंतर ११ वाजता निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.

01 Feb, 24 10:25 AM

'आश्वासनं पूर्ण करतील अशी अपेक्षा'

निर्मला सीतारामन आपली आश्वासनं पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. मुद्द्यांपासून दूर नेण्याऐवजी बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, एमएसएमई क्षेत्राच्या समस्या सारख्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया एमडीएमके खासदार वाईको यांनी दिली.

01 Feb, 24 10:07 AM

बजेटसोबत ताळमेळ बसवू शकेल का शेअर बाजार?

केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प पाहता कोणतीही नकारात्मक बातमी येण्याची शक्यता नाही, पण बाजाराच्या दृष्टिकोनातून फारसा लोकप्रिय अर्थसंकल्पही बाजाराला आवडणार नाही. करदात्यांना कर आघाडीवर थोडा दिलासा मिळाला तर बाजार त्याचे स्वागत करेल, पण सरकारनं वित्तीय तूट आघाडीवर शिथिलता आणली तर बाजाराला ते बाजारासाठी नकारात्मक ठरू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

01 Feb, 24 10:00 AM

नव्या संसद भवनात पहिल्यांदा सादर होणार बजेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करण्यासाठी तयार झाल्या आहेत. नव्या संसद भवनात सादर होणारा हा पहिला अर्थसंकल्प असेल.

01 Feb, 24 09:55 AM

अर्थसंकल्पापूर्वीची कॅबिनेट बैठक सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाची प्रत संसदेत पोहोचवण्यात आली. आता ११ वाजता अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

01 Feb, 24 09:49 AM

१ लाखांपर्यंतची कर सूटीची मर्यादा हवी

आपात्कालिन वैद्यकीय परिस्थितीत मिळणाऱ्या आर्थिक संरक्षणामुळे सध्या अनेक ग्राहक आरोग्य विमा घेण्याच्या विचारात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कलम 80D कर सूटीची मर्यादा महागाईशी जोडली पाहिजे. कलम 80D अंतर्गत मर्यादा १ लाख रुपये करावी, अशी उद्योगांची मागणी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

01 Feb, 24 09:36 AM

EV क्षेत्राला बूस्ट मिळणार का?

देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पातून ईव्ही क्षेत्राला बूस्ट मिळू शकते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी तिसऱ्या फेजबाबत काही निर्णय होऊ शकतो. अर्थसंकल्पात फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME) योजनेच्या आगामी टप्प्यासाठी अंदाजे 10,000-12,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते.

01 Feb, 24 09:28 AM

आयकर दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली

आयकर दाखल करणाऱ्यांची संख्या सव्वा तीन कोटींनी वाढून जवळपास सव्वा आठ कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी दिली होती.

01 Feb, 24 09:20 AM

अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाच्या दिशेनं रवाना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटो सेशन केलं. त्यानंतर अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या. राष्ट्रपतींकडून अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर त्या संसदेत पोहोचतील आणि त्यानंतर अर्थसंकल्प सादर करतील.

01 Feb, 24 09:16 AM

महिलांसाठी उपाययोजना असू शकतात - के.व्ही. सुब्रमण्यन

"सर्वप्रथम, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे एक लेखानुदान आहे. संपूर्ण अर्थसंकल्प जून किंवा जुलैमध्ये निवडणुकीनंतर सादर केला जाईल. म्हणून या अर्थसंकल्पात फारशी पावले उचलली जाणार नाहीत.अर्थव्यवस्था खूप चांगल्या स्थितीत असल्यानं आणि ७.३ टक्के विकास दराची शक्यता असल्यानं, मला वाटते की सरकारने जे काही केले आहे ते पुढे नेलं जाऊ शकतं. कदाचित काही उपाययोजना केल्या जातील, विशेषत: महिलांसाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात," अशी प्रतिक्रिया आयएमएफचे कार्यकारी संचालक आणि भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यन यांनी दिली.

01 Feb, 24 09:03 AM

निर्मला सीतारामन यांचा होणार विक्रम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच त्यांच्या नावे काही रेकॉर्डही होतील. त्या सलग पाच अर्थसंकल्प आणि एक अंतरिम बजेट सादर करणाऱ्या  माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.

01 Feb, 24 08:43 AM

अर्थमंत्रलायच्या दिशेनं निघाल्या निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या निवासस्थानाहून रवाना झाल्या आहे. त्या सर्वप्रथम अर्थमंत्रालयात पोहोचतील. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमसोबत त्या ठिकाणी फोटो काढला जाईल. त्यानंतर अर्थमंत्री राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी जातील. निर्मला सीतारामन या आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. हे निवडणुकीचं वर्ष असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प असेल.

01 Feb, 24 08:33 AM

नव्या कर व्यवस्थेत आणखी सुधारणा होणार का?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाप आहेत. नवीन कर प्रणालीकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष लागलंय. जुन्या कर प्रणालीला पर्याय म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये सादर केलेली नवीन कर प्रणाली १ एप्रिल २०२३ पासून डीफॉल्ट पर्याय बनली आहे. आता नव्या करप्रणालीचा अवलंब करण्याची आणखी एक संधी मिळू शकते, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी सीतारामन यांनी उच्च उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी नवीन कर प्रणालीमध्ये अतिरिक्त शुल्क काढून टाकले होते आणि ५० हजार रुपयांच्या मानक वजावटीला परवानगी दिली होती.

01 Feb, 24 08:29 AM

अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस आणि अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच महागाईचा भडका उडाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून तेल विपणन कंपन्यांनी आज १ फेब्रुवारीपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 

टॅग्स :अर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019निर्मला सीतारामन