Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोबाईल चार्जर स्वस्त होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी मोबाईल फोन आणि मोबाईल फोन चार्जरवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता देशात मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त होणार आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने कॅमेरा लेन्ससारख्या मोबाइल फोनच्या प्रमुख घटकांवरील कर शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हे करण्यामागे सरकारचा उद्देश भारतातील मोबाईल फोन उत्पादनाला चालना देणे हा होता.
गेल्या सहा वर्षात देशांतर्गत उत्पादनात बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल पार्ट्स, पीव्हीसी आणि मोबाईलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
दरम्यान, नवीन बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदीदारांपासून ते उत्पादक आणि टेक ब्रँडपर्यंत सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला असून कस्टम ड्युटीतील बदलांमुळे मोठी बचत होणार आहे. मूलभूत कस्टम ड्युटी टेक ब्रँड किंवा निर्माते जेव्हा इतर देशांतून त्यांची उपकरणे किंवा घटक भारतात आयात करतात तेव्हा त्यांना भरावे लागते. त्यामुळे आता उत्पादकांना कमी पैसे द्यावे लागतील आणि याचा परिणाम डिव्हाइस, स्मार्टफोन, मोबाइल चार्जर आणि घटकांच्या किंमतीवर होईल. उपकरणांवरील कर आणि मूलभूत कस्टम ड्युटीसारखे अतिरिक्त खर्च त्यांची बाजारातील किंमत ठरवतात.