Join us  

Union Budget 2024: शहरातील नागरिकांसाठी खूशखबर; १ कोटी लोकांना घरे देण्याची सीतारामन यांच्याकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:01 PM

शहरातील १ कोटी गरीब नागरिकांना घरे देण्यात येणार असून यासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Nirmala Sitharaman ( Marathi News ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. शहरातील १ कोटी गरीब नागरिकांना घरे देण्यात येणार असून यासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे घराच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांची चिंता दूर होण्यास मदत होणार आहे.

याबाबतची घोषणा करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "पंतप्रधान आवास योजना अर्बन २.० अंतर्गत, शहरातील १ कोटी गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या घराची गरज पूर्ण करण्यासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षांत २.२ लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय सहाय्यतेचाही समावेश असणार आहे," अशी माहिती सीतारामन यांनी दिली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी युवा वर्गासाठीही मोठी घोषणा केली आहे. देशातील टॉप कंपन्यांमध्ये युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्यातून दर महिना युवकांना ५ हजार रुपये मासिक भत्ता दिला जाईल. हा मासिक भत्ता पंतप्रधान इंटर्नशिप योजनेतंर्गत १२ महिन्यांपर्यंत असेल. युवकांना १२ महिने कंपन्यात इंटर्नशिप मिळेल. पुढील ५ वर्षात देशातील टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

घरांबाबत पंतप्रधान आवास योजना काय आहे?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शहरातील गरीब नागरिकांसाठी घरांची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वीपासून घरांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक घटकतील लोकांना स्वतःचे घर देते. या योजनेच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचे घर नाही अशा लोकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे, विधवा, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो. ही घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन, शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा मिळतात.

टॅग्स :निर्मला सीतारामनकेंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2024पंतप्रधान