Union Budget 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे नवनिर्वाचित सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात लघुउद्योजकांना सरकारने मोठा दिलासा देत मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. सरकारने कर्जाची मर्यादा थेट दुप्पट केल्याने व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उद्योजकांना मदत होणार आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना व्यवसाय उभारणीत मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने खास कर्जाची व्यवस्था करुन ठेवली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो किंवा इतर कुठलाही लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. यापूर्वी सदर योजनेत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. या कर्जाची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत करण्याचे आश्वासन भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज अर्थमंत्र्यांकडून कर्जमर्यादा वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा- पहिल्यांदाच नोकरी लागली तर केंद्र सरकार एक पगार देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
काय आहे मुद्रा योजना?
देशातील मध्यमवर्गीयांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी हातभार लागावा, यासाठी सरकारने २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेत तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कुठल्याही गॅरंटीशिवाय दिले जात होते. या योजनेंतर्गत आतापर्यंत लाखो लोकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे.
हेही वाचा- Live Updates: एफडीआय, परदेशी गुंतवणूकीचे नियम सोपे केले जाणार; मुलांसाठी NPS वात्सल्य योजनेची घोषणा
या योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण, अशा तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. आतापर्यंत पहिल्या श्रेणीत ५० हजारापर्यंतचे कर्ज दिले जात होते. दुसऱ्या श्रेणीत ५० हजार ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. तर, तिसऱ्या श्रेणीत ५ लाख ते १० लाखापर्यंतचे कर्ज दिले जात होते. ही मर्यादा आता वाढणार आहे. या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची गॅरंटी द्यावी लागत नाही. कर्ज घेण्यासाठी अर्जासोबत तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, हे सांगावे लागते.
कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज देतात. हा व्याजदर १० टक्के ते १२ टक्क्यांपर्यंत असू शकतो. अर्जासोबत दिलेल्या सर्व कागदपत्रांची बँकेकडून छाननी केली जाते आणि त्यानंतर सर्वकाही ठीक असल्यास मुद्रा कार्ड जारी केले जाते. हे एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे, ज्याद्वारे तुम्ही व्यवसायासाठी आवश्यक असेल तेव्हा पैसे देऊ शकता.