Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी(दि.23) सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सरकारने करदात्यांना सूट देण्याची घोषणा केली. तसेच, मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त होणार असल्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. गेल्या 6 वर्षांत देशांतर्गत उत्पादनात खूप वाढ झाल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी निर्मला सीतारामन म्हणतात, भारतात मोबाईल फोनचे उत्पादन तीन पटीने वाढले आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी मोबाईल पार्ट्स, गॅझेट्स आणि पीव्हीसीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवर सीमाशुल्कात 15 टक्के कपात करण्यात येत आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना कमी दरात स्मार्टफोन आणि चार्जर खरेदी करता येईल. यासोबतच विजेच्या तारा आणि एक्स-रे मशीनही स्वस्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वीही घोषणा करण्यात आली
याआधी जानेवारीमध्येही सरकारने स्मार्टफोन कॉम्पोनंट्सवरील आयात शुल्क 10 टक्के कमी करण्याची घोषणा केली होती. आता बीसीडी (बेसिक कस्टम ड्युटी) मध्ये कपात केल्याची घोषणा केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, सरकार देशात स्मार्टफोन उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे, सरकारने कोबाल्ट, लिथियम आणि तांब्यासह 25 महत्वाच्या खनिजांवरील सीमा शुल्क (कस्टम ड्यूटी) पूर्णपणे हटवण्याची घोषणा केली आहे. हे सीमा शुल्क हटवल्याने देशात लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन स्वस्त होईल.