केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाच नव्या स्कीमच्या घोषणा करण्यात आली आहे. तसेच शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी निरनिराळे उपाय करण्यात येणार आहेत. याच दरम्यान निर्मला सीतारामन यांनी महिलांच्या विकासासाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली.
अर्थसंकल्पात कौशल्य प्रशिक्षणाबाबतही विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच, स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी MSME अंतर्गत अनेक योजना जाहीर केल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. बिहारमध्ये चार एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी २६००० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
निर्मला सीतारामन अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, जो एक विक्रम ठरला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर भर देण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यापूर्वी या योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येत होतं. आता त्यात वाढ करण्यात आली असून त्या अंतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. तसेच तरुणांना इंटर्नशिपसाठी व्यापक योजना आणण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. सरकारी बँका अंतर्गत पडताळणीनंतर एमएसएमईला कर्ज देणार. खासगी क्षेत्रासोबच मिळून ई कॉमर्स एक्सपोर्ट हब बनेल असं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या.