नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ वर्षाचं बजेट सादर करत करदात्यांना आयकरात दिलासा दिला आहे. ही सूट नव्या कर व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्यांनाच मिळणार आहे. आता नव्या कर व्यवस्थेत बदल केले आहेत. अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅब आणि रेटमध्ये बदलाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानुसार स्टँडर्ड डिडक्शनात ५० हजाराहून वाढ करत ७५ हजार मर्यादा करण्यात आली आहे. तर ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आलं आहे.
पगारात किती होणार बचत?
अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये जो बदल करण्यात आला आहे त्यामुळे नोकरदार वर्गाच्या पगारात १७५०० रुपये बचत होऊ शकतात असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
एकूण उत्पन्न | आयकर दर |
०-३ लाखापर्यंत | शून्य |
३-७ लाखापर्यंत | ५ टक्के |
७-१० लाखापर्यंत | १० टक्के |
१०-१२ लाखापर्यंत | १५ टक्के |
१२-१५ लाखापर्यंत | २० टक्के |
१५ लाखाहून अधिक | ३० टक्के |
अबकी बार आंध्र प्रदेश-बिहार; अर्थसंकल्पात चंद्राबाबू, नितीश कुमारांसाठी खजिना उघडला
कसा होणार फायदा?
नव्या तरतुदीतून होणाऱ्या फायद्याबाबत आयकर तज्ज्ञ सीए कमलेश कुमार सांगतात की, समजा, घनश्याम हा वार्षिक १० लाख रुपये पगार घेतो. त्याने नवी कर व्यवस्था निवडली आहे. तर मागील वर्षी याच उत्पन्नावर इन्कम टॅक्स आणि सेस मिळून त्याला ५४६०० रुपये भरावे लागत होते. मात्र आता इन्कम टॅक्स आणि सेस मिळून त्याला ४४२०० रुपये कर भरावा लागेल.
उदाहरणातून समजून घ्या
घनश्यामचं उत्पन्न १० लाख रुपये आहे. मागील वर्षी त्याला स्टँडर्ड डिडक्शन ५० हजार रुपये मिळालं होतं. तेव्हा त्याचे उत्पन्न ९ लाख ५० हजार झाले. त्यातील ३ लाखापर्यंत कुठलाही कर नाही. त्यावरील ६ लाखापर्यंत ५ टक्के म्हणजे १५ हजार रुपये कर होता. मागील वर्षी ६ ते ९ लाखांच्या प्रणालीत १० टक्के कर होता. त्याचा अर्थ ३० हजार रुपये कर, त्यानंतर उरलेल्या ५० हजारांवर १५ टक्के कर लागू होता. असे मिळून एकूण ५२,५०० रुपये आयकर आला. त्यावर ४ टक्के सेस लावला, त्यात २१०० रुपये जोडल्यानंतर एकूण ५४६०० रुपये घनश्यामला आयकर भरावा लागला.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा
आता किती कर भरावा लागेल?
घनश्यामचं उत्पन्न आजही १० लाख रुपये आहे. परंतु स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार मिळणार. म्हणजे त्याचे उत्पन्न ९.२५ लाख झाले. त्यातील ३ लाखापर्यंत कर नाही. ३ ते ७ लाखावर त्याला ५ टक्के कर भरावा लागेल. म्हणजे २० हजार रुपये. त्यानंतर उरलेल्या सव्वा दोन लाखावर १० टक्के कर लागणार. म्हणजे २२५०० रुपये...एकूण मिळून कराची रक्कम ४२५०० रुपये होईल. त्यावर ४ टक्के सेस मिळून १७०० रुपये अधिक द्यावे लागतील म्हणजे एकूण कर ४४२०० रुपये इतका होईल. म्हणजे गेल्यावेळच्या तुलनेत यंदा घनश्यामचे १०४०० रुपये वाचले.