अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नव्या 'SWAMIH' फंडाची घोषणा केली. गृहप्रकल्पांमधील एक लाख युनिट्स पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचा नवा 'SWAMIH' फंड तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. ज्या घर खरेदीदारांच्या घराचा ताबा अडकला आहे, त्यांना दिलासा देणं हा या योजनेचा उद्देश आहे. रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्राने SWAMIH नावाच्या निधीची घोषणा केली होती.
निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्या फंडाच्या यशानंतर SWAMIH Fund 2 ची घोषणा केली. SWAMIH Fund 1 अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्पातील ५० हजार घरांचं काम पूर्ण झालं असून घर खरेदीदारांना चाव्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
यावर्षी ४० हजार युनिट्स पूर्ण होतील
२०२५ मध्ये आणखी ४० हजार युनिट्स पूर्ण होतील, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत होईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. ही कुटुंबं गृहकर्जावर ईएमआय भरत होती. तसेच आपले विद्यमान घराचं भाडंही ते देत होते. याच्या आधारे SWAMIH Fund 2 स्थापना सरकार, बँका आणि खाजगी गुंतवणूकदारांच्या योगदानानं आर्थिक सुविधा म्हणून केली जाईल, असं सीतारामन म्हणाल्या. एकूण १५,००० कोटी रुपयांच्या या निधीत आणखी एक लाख युनिट्स जलद गतीनं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.