Budget 2025 key announcements (Marathi News: ) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असल्याचे आणि पुढेही मिळत राहील, असे सांगितले. अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहा वर्षांच्या विशेष मिशनची घोषणा केली.
सद्यस्थितीत खाद्यतेलाच्या बाबतीत देश मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार देशातील खाद्यतेलाच्या किमती ठरत असतात. त्यामुळे खाद्य तेलाच्या बाबतीतील परावलंबित्व कमी करून देशाला खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी केंद्र सरकार सहा वर्षांचं एक मिशन सुरू करणार आहे. निर्मला सीतारमण यांनी त्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. याबरोबरच देशात वाढत असलेल्या मध्यमवर्गाची खर्च करण्याची शक्ती वाढवण्यावर अर्थसंकल्पामधून लक्ष्य केंद्रित करण्यात आलं आहे.
तसेच अर्थसंकल्प सादर करत असताना वित्तमंत्र्यांनी सांगितलं की, यंदाचा अर्थसंकल्प हा टॅक्स, पॉवर, अर्बन डेव्हलपमेंट, मायनिंग फायनान्शियल सेक्टर आणि रेग्युलेटरी पॉलिसीसारख्या सहा प्रमुख क्षेत्रांमध्ये सुधारणेला प्राधान्य देणारा आहे.
तत्पूर्वी निर्मला सीतारमण यांनी सकाळी ११ वाजता आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात केली. या अर्थसंकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागचे चार अर्थसंकल्प आणि एक लेखानुदानाप्रमाणेच हा अर्थसंकल्पही पेपरलेस होता.