Join us

Union Budget: पेट्रोल-डिझेलची दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच; बजेटमधील करवाढीचा पहिला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 7:45 PM

केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला.

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. यावेळी पेट्रोल-डिझेल प्रति लिटरमागे 1 रुपये अतिरिक्त कर आकारण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. त्याची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलवर लादण्यात आलेल्या 1 रुपयांचा अतिरिक्त कर मध्यरात्रीतून लागू होणार असल्यानं वाहन चालकांना याचा भुर्दंड पडणार आहे.  

त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 2.50 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 2.30 रुपयांनी महागणार आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत 70.51 रुपये, तर डिझेलची प्रतिलिटर किंमत 64.33 रुपये आहे. दुसरीकडे मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 76.15 रुपयांना मिळते, तर डिझेलची किंमत 67.40 रुपये आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवर रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रत्येकी 2 रुपयांनी भडकणार आहे. सध्या पेट्रोलवर 17.98 रुपये,  डिझेलवर 13.83 रुपये प्रतिलिटर एक्साइज ड्युटी आकारली जाते. त्यात 1 रुपयाची भर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेसमध्येही 1 रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी भडकणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारही कर आकारले. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकतात. किमान किमतीवर सेंट्रल एक्साइज ड्युटी लावल्यानंतर स्थानिक सेल्स टॅक्स आणि व्हॅल्यू अॅडेड टॅक्सही वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल 2.50 रुपये प्रतिलिटरनं भडकलं आहे. तर डिझेलच्या किमतीतही 2.30 रुपये प्रतिलिटरची वाढ करण्यात आली आहे. 

पाणी संकटावर मात करण्यासाठी विविध योजना सरकार आणण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याची चर्चा आहे. या प्रस्तावावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आणि अन्य संस्थांनी सहमती दाखविली आहे. 2018मध्ये केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलवर 8 रुपये रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स लावण्यात आला होता. यातून जमा होणारी रक्कम रस्त्याच्या विकासकामांसाठी वापरण्याचा सरकारचा विचार होता. 

टॅग्स :पेट्रोलकेंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2019