Join us  

Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : रिटर्न करताना चूक झाल्यास ते अपडेट करण्याची संधी मिळणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 12:22 PM

कॉर्पोरेट क्षेत्रालाही दिलासा. कॉर्पोरेट कर १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी सुरू करणार असल्याचीही मोठी घोषणा केली. याशिवाय आता इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल केल्यानंतर त्यात आकडेवारीत काही चूक असल्यात ती दुरूस्त करण्याची संधीही दिली जाणार आहे. 

"आम्हाला विश्वासावर आधारित कर प्रणाली तयार करायची आहे. करदात्यांना चुका सुधारण्यासाठी अतिरिक्त पेमेंटच्या सुविधेसह प्राप्तिकर रिटर्न अपडेट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. कर प्रणालीत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. आता करदाता त्याचे रिटर्न अपडेट करू शकतो," अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

कॉर्पोरेट टॅक्स १५ टक्क्यांवरकॉर्पोरेट कर १८ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला. तसंच अधिभार (सरचार्ज) १२ टक्क्यांवरून ७ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याशिवाय इन्कम बेस १ कोटींवर १० कोटी रुपये करण्यात आल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली. याशिवाय, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा लाभांना मदत करण्यासाठी आणि त्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर कपातीची मर्यादा १० टक्क्यांवरून १४ टक्के करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

अर्थव्यवस्था तेजीनं वाढतेयआपली अर्थव्यवस्थाही तेजीनं वाढत आहे. तसंच भारत आपली विकास यात्रा कायम ठेवेल असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पामुळे भारताला पुढील २५ वर्षांचा पाया रचण्यासाठी मदत होईल. पुढील आर्थिक वर्षात ग्रोथ ९.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. ही मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सर्वाधिक वाढ असल्याची माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली.

टॅग्स :अर्थसंकल्प 2022इन्कम टॅक्सनिर्मला सीतारामन