नवी दिल्ली : गैरमार्गांनी कमावलेली मालमत्ता लपविण्यासाठी होणारे बेनामी व्यवहार रोखण्यासाठी जरब बसेल, अशी उदाहरणे निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.जेटली म्हणाले की, पॅन आणि आधार क्रमांक जोडणे हा करचुकवेगिरीच्या विरोधात उत्तम उपाय होऊ शकतो. त्यातून एकाच व्यक्तीचे अनेक पॅन क्रमांक रोखले जातील. खर्च आणि उत्पादन यातील तफावत समोर येईल. मात्र, खाजगीपणाच्या नावाखाली याला विरोध होत आहे. करदाते आणि कर अधिकारी यांचा कमीतकमी संपर्क कसा येईल, हे पाहण्यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. यातून करविभागाचा खर्च कमी होईल, भ्रष्टाचार आणि अकारण छळाचे प्रकारही कमी होतील, असे जेटली म्हणाले.आयकर दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जेटली यांनी आयकर अधिकाºयांसमोर भाषण केले, त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, कराचे दर अधिक व्यवहार्य होण्याची गरज आहे. त्यासाठी कराधार अधिक व्यापक व्हायला हवा. अधिकाधिक लोक कराच्या कक्षेत यायला हवेत.आपल्या भाषणात जेटली यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. तथापि, अलीकडेच राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाचा बेनामी व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. १ हजार कोटींच्या या कथित व्यवहारप्रकरणी दिल्ली आणि हरियाणासह अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या.
...तर बेनामी व्यवहारांना चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 4:34 AM