Nirmala Sitharaman: आताच्या घडीला देशभरातील जनता दरवाढ आणि महागाईमुळे मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेली पाहायला मिळत आहे. यावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई नियंत्रणासाठी राज्यांनी आपली भूमिका बजावावी, असे म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. महागाई कमी करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन वेळेस कपात केली आहे. आता राज्य सरकारांनी व्हॅट करात कपात करण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. काही राज्यांमधील महागाई दर हा देशाचा महागाई दरांपेक्षाही अधिक आहे. ही बाब चिंतेची असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले.
जागतिकीकरणामुळे महागाईत वाढ झाली आहे
जागतिकीकरणामुळे महागाईत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महागाईवर आणखी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, अधिक रोजगार निर्माण करणे आणि आर्थिक समानता साध्य करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. महागाई आमच्या समोरील प्राथमिक विषय नाही, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते.
दरम्यान, देशातील महागाईने उच्चांक गाठलाय. मात्र, गेल्या दोन महिन्यात महागाईचा दर घसरू लागला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केली आहे. एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.७९ टक्क्यांवर पोहचला होता. जुलै महिन्यात हा दर ६.७१ टक्के इतका झाला. ऑगस्ट महिन्यातही महागाई दरात आणखी घट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.