Join us  

Startup: भन्नाट! देशातील ६४० जिल्ह्यांत ६५,८६१ स्टार्टअपची नोंदणी; दिल्या ७ लाखांहून अधिक नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:20 AM

‘स्टार्टअप इंडिया फंड योजने’अंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी ९४५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक वर्षांपासून देशातील स्टार्टअपची (Startup) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे स्टार्टअपमधील स्थान वरती आले आहे. यातच आता देशातील स्टार्टअपची नोंदणी वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली. देशातील ६४० जिल्ह्यांमधील स्टार्टअपची नोंदणी ६५ हजारांवर गेली असून, या स्टार्टअपच्या माध्यमातून ७ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती झाल्याचे गोयल यांनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या पातळीवरील सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठबळामुळे २०१६-१७ मध्ये ७२६ असलेली देशातील नोंदणीकृत स्टार्टअप उपक्रमांची संख्या चालू आर्थिक वर्षांत १४ मार्चपर्यंत ६५,८६१ पर्यंत वाढली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यसभेतील एका लेखी उत्तरात पीयूष गोयल यांनी सदर माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. 

देशात नवउद्यमी संस्कृतीला चालना

सन २०१६-१७ मधील ७२६ वरून, १४ मार्च २०२२ पर्यंत ६५,८६१ मान्यताप्राप्त नवउद्यमी उपक्रम देशात सध्या कार्यरत आहेत. देशात नवउद्यमी संस्कृतीला चालना देण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने १६ जानेवारी २०१६ रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रम सरकारने सुरू केला होता. अर्थव्यवस्थेत वाढीसह, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे उद्दिष्ट यातून राखण्यात आले. देशभरात ६४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरलेले हे उपक्रम आहेत आणि त्यांच्याद्वारे प्रत्येकी सरासरी ११ नोकऱ्यांची निर्मिती करून एकंदरीत सात लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्याची नोंद आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

दरम्यान, मान्यताप्राप्त नवउद्यमी उपक्रम माहिती-तंत्रज्ञान सेवा, वित्त तंत्रज्ञान, हार्डवेअर तंत्रज्ञान, एंटरप्राइझ सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॅनोटेक्नॉलॉजी यांसारख्या ५६ वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये पसरलेले आहेत. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी स्पष्ट केले की, चालू वर्षी २८ फेब्रुवारीपर्यंत वाणिज्य मंत्रालयाने ‘सिडबी’ला २,७९१.२९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे, जिने ८२ पर्यायी गुंतवणूक निधींना (एआयएफ) ६,७९५ कोटी रुपये देण्याची कटिबद्धता दर्शविली आहे, तर समर्थित एआयएफद्वारे ५७४ नवउद्यमी उपक्रमांमध्ये ८,७८५ कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. २०२०-२१ पासून सुरू झालेल्या ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड योजने’अंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी ९४५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :व्यवसायभारतनोकरी