Join us

भारताचा विकास दर घसरणार; येऊ शकतो ५.७ टक्क्यांपर्यंत, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 10:06 AM

भारताचा जीडीपी विकास दर गेल्या वर्षी ८.२ टक्के इतका होता. तो यंदाच्या वर्षी ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्रे: भारताचा जीडीपी विकास दर गेल्या वर्षी ८.२ टक्के इतका होता. तो यंदाच्या वर्षी ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे, असे भाकीत युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संघटनेने आपल्या अहवालात केले आहे. २०२३ साली भारताच्या जीडीपी विकास दरामध्ये आणखी घसरण होऊन तो ४.७ टक्के होण्याची शक्यता असल्याचेही या संघटनेने म्हटले आहे.

या अहवालात म्हटले आहे की, भारताचा जीडीपीचा विकास दर गेल्या वर्षी ८.२ टक्के होता. जी२० देशांमधील हा सर्वाधिक जीडीपी विकास दर आहे. मात्र पुरवठा साखळीतील अडथळे कमी झाल्यामुळे तसेच वाढत्या देशांतर्गत मागणीचा जीडीपी विकास दरावर परिणाम होऊन त्यात घट झाली. 

केंद्र सरकारने उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना सुरू केली. त्यामुळे काॅर्पोरेट गुंतवणूक येण्यास हातभार लागला. मात्र, भारताला इंधनाच्या आयातीवर मोठा खर्च करावा लागत असल्याने वित्तीय तुटीचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांच्या परिणामी भारताचा जीडीपी विकास दर यंदाच्या वर्षी ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संघटनेने म्हटले आहे की, भारत सरकारने रस्ते व रेल्वे क्षेत्रातील भांडवली खर्च वाढविण्याचे ठरविले आहे. (वृत्तसंस्था)  

टॅग्स :अर्थव्यवस्था