Join us

न चालणाऱ्या पेट्रोलपंपांचा ताबा नव्या डीलर्सकडे

By admin | Published: February 16, 2017 12:35 AM

जे पेट्रोल पंप व्यवस्थित सुरू नाहीत, जिथे पेट्रोलजन्य पदार्थांची विक्री सुरू नाही वा जे क्षमतेने चालत नाहीत, ते पेट्रोल पंप नव्या डीलरला

नवी दिल्ली : जे पेट्रोल पंप व्यवस्थित सुरू नाहीत, जिथे पेट्रोलजन्य पदार्थांची विक्री सुरू नाही वा जे क्षमतेने चालत नाहीत, ते पेट्रोल पंप नव्या डीलरला चालविण्यासाठी दिले जातील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली. ‘हॉलीडे स्कीम’अंतर्गत या पेट्रोलपंपांवर आता राज्याच्या अखत्यारितील आइल मार्केटिंग कंपनी निगराणी करतील. दर सहा महिन्यांनी याचे मूल्यमापन करण्यात येईल. जर दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा ५० टक्क्यांहून कमी विक्री असेल, तर हे पंप यादीतून वगळण्यात येतील. ज्या मूळ व्यक्तींना पेट्रोल पंपांचे वाटप करण्यात आले आहे, अशा ठिकाणी काही समस्या आहेत. कुटुंबातील वाद, भागीदारीतील वाद, तसेच आर्थिक प्रश्नांमुळे हे वाद निर्माण झालेले आहेत. अशा पेट्रोल पंप मालकांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात त्यांनी पेट्रोल पंप आणि एकूणच विक्रीबाबत सुधारणा करावयाच्या आहेत. सहा महिन्यांनंतर याची पाहणी करण्यात येईल. त्यानंतरही तीन महिन्यांची संधी देण्यात येईल. तरीही सुधारणा न झाल्यास डीलरसाठी दोन वर्षांच्या हॉलीडेवर जाण्याचा पर्याय देण्यात येईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. तथापि, तत्पूर्वी विद्यमान डीलरला हॉलीडेवर जात असल्याचे लेखी कारण द्यावे लागेल. त्याच्या आर्थिक अडचणींचाही यात उल्लेख करावा लागेल. अर्थात, हा पर्याय विद्यमान डीलरने नाकारल्यास त्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल आणि त्यानंतर इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून पेट्रोल पंपावर थेट कारवाई करण्यात येईल. विद्यमान डीलरकडून पेट्रोल पंप ताब्यात घेतल्यानंतर, आॅइल कंपनीकडून तो नव्या डीलरला ताब्यात देण्यात येईल. हा करार दोन वर्षांसाठी असेल. ज्या डीलरकडून हा पंप परत घेण्यात आला आहे, तो डीलर लेखी हमीवर तो पुन्हा मिळवू शकतो. पेट्रोल पंपांमध्ये एकूणच सुधारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)