आपलं स्वत: एक घर असावं हे सर्वसामान्य भारतीयाचं मोठं स्वप्न असतं. भावनिक समाधानासोबतच लोक याला गुंतवणुकीचा देखील एक चांगला पर्याय मानतात. पण अलीकडच्या काळात, रिअल इस्टेट मार्केटमध्ये बरेच चढ-उतार झाले आहेत आणि किंमती देखील जवळजवळ स्थिर आहेत. अशा स्थितीत घरांची विक्री वाढली असून आता देशातील रिकामी घरांची संख्या ४.६१ लाखांवर आली आहे. जर तुमचाही घर घेण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते...
PropEquity या रिअल इस्टेट मार्केटवर नजर ठेवणाऱ्या कंपनीच्या माहितीनुसार डिसेंबर २०२२ च्या अखेरीस देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या १० टक्क्यांनी कमी होऊन ४,६१,००० वर आली आहे. घरांची चांगली विक्री झाल्यानं हे शक्य झालं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत (म्हणजे सप्टेंबरमध्ये) या नऊ शहरांमध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या ५,१२,५२६ होती.
गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढतेय
PropEquity चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर जासुजा म्हणतात की, अनेक आव्हानं असूनही या वर्षी घरांच्या विक्रीत चांगली सुधारणा झाली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रिअल इस्टेट उद्योगात मागणी आणि सकारात्मक धारणा वाढत आहे. व्याजदरात मोठी वाढ होऊनही ग्राहक गृहकर्ज घेत आहेत.
कोलकाता आणि मुंबईत रिकामी घरे झाली कमी
PropEquity च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर अखेरीस कोलकाता येथे रिक्त घरांची संख्या २०,०९६ इतकी होती. डिसेंबरमध्ये ती १२ टक्क्यांनी घटून १७,७१५ वर आली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत ही संख्या ३०,९८६ वरून २७,८१५ युनिट्सवर म्हणजेच १० टक्क्यांनी कमी झाली, तर मुंबईत ती ६१,७५५ वरून ५ टक्क्यांनी घटून ५८,५८७ वर आली. दुसरीकडे, ठाण्यातील रिकाम्या घरांची संख्या १,०८,८५४ युनिटवरून ११ टक्क्यांनी घसरून ९७,११७ इतकी झाली आहे.
दिल्ली एनसीआरमध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या ४६,४५२ वरून १० टक्क्यांनी घसरून ४१,६९३ युनिट्सवर आली आहे. तर बेंगळुरूमध्ये हा आकडा ५८,३९० वरून १६ टक्क्यांनी घसरून ४९,२४६ युनिटवर आला आहे. पुण्यात ही संख्या ७१,६४४ युनिटवरून ११ टक्क्यांनी घसरून ६५,६१२ युनिटवर आली आहे. हैदराबादमध्ये सप्टेंबरअखेर रिक्त घरांची संख्या ९३,४७३ होती. आताही ते फक्त ९३,४७३ युनिट्स आहे.