नवी दिल्ली : फसव्या स्पॅम कॉल अथवा संदेश यांपासून सुटका मिळण्यासाठी मोबाईल फोन वापरकर्त्यांना आणखी किमान ६ महिने वाट पाहावी लागणार आहे. कारण, असे कॉल आणि संदेश ओळखून ते ब्लॉक करण्यासाठी आवश्यक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यास दूरसंचार सेवा दाता कंपन्यांना आणि असे कॉल व संदेश पाठविणाऱ्या संस्था यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची मुदत भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाने (ट्राय) दिली आहे.
स्पॅम काॅलपासून सुटका देण्यासाठी दूरसंचार विभागाने एआयचा वापर सुरू केला आहे. त्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारून १ मेपर्यंत अनपेक्षित कॉल व संदेश बंद करण्याचे निर्देश दिले होते. आता त्यास ६ महिने मुदत दिली आहे. ग्राहकाची संमती असेल, तर असे कॉल व संदेश पाठविण्याची सूट कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी कंपन्यांना ग्राहकांची परवानगी घ्यावी लागेल. बँक, विमा, वित्त आणि व्यावसायिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत ग्राहकांची परवानगी घेतील. अन्य कंपन्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
हे करावे लागेल
अनावश्यक काॅल्स/ एसएमएससाठी सहमती न देणाऱ्यांना त्रास हाेणार नाही, याची काळजी कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. ग्राहकांची माहिती वापरणाऱ्या संस्थांना ग्राहकांचे सहमती पत्र ठेवावे लागेल. सहमती घेण्यापूर्वी कंपन्यांना त्या काेणते एसएमएस किंवा कशासंदर्भात काॅल करतील, याबाबत माहिती घ्यावी लागेल. मंजूरीसाठी ग्राहकांना ओटीपी पाठविण्यात येईल.
मुदतवाढ यंत्रणा उभारण्यासाठीच
६ महिन्यांची मुदत यंत्रणा तयार करण्यासाठी आहे. कॉल अथवा संदेश बंद करण्यासाठी नव्हे. कारण जास्त अनपेक्षित कॉल अनोंदणीकृत लोकच करतात. त्यांना ग्राहकांच्या तक्रारीनंतरच ब्लॉक केले जाणार आहे. संदेश कसे रोखावेत याची माहितीही ग्राहकास द्यावी लागेल.