बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर विक्रीच्या दबावाने बाजार बंद होताना पुन्हा ८० हजारांच्या खाली आला. या सप्ताहामध्ये जगभरातील वातावरण आणि प्रमुख आयटी कंपन्यांची तिमाही कामगिरी यावर बाजाराची दिशा ठरणार आहे. आगामी अर्थसंकल्प जवळ येत असल्याने बाजारात काही प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यताही दिसत आहे.
गतसप्ताहामध्ये सेन्सेक्सने ८०,३९२.६४ तर निफ्टीने २४,४०१ अंशांच्या नवीन उच्चांकांची नोंद केली. त्यानंतर विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स ८० हजारांची पातळी राखू शकला नाही. आता अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणामध्ये बाजारावर विक्रीचे दडपण येणार आहे. त्याचप्रमाणे आगामी सप्ताहामध्ये जाहीर होणारे टीसीएल आणि एचसीएल या प्रमुख आयटी कंपन्यांचे निकाल बाजाराचे भवितव्य ठरविणारे असतील. मिडकॅप निर्देशांक ४८ हजार अंशांचा टप्पा पार करणार का? याकडेही बाजाराचे लक्ष असणार आहे.
संभ्रमातील परकीय वित्तसंस्था पुन्हा सक्रिय
गेले काही दिवस खरेदी आणि विक्री अशा संभ्रमात असलेल्या परकीय वित्तसंस्था जुलै महिना सुरु होताच सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांमध्येच या संस्थांनी ७,९६२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. या खरेदीमुळेच चालू वर्षामध्ये या संस्थांनी भारतामध्ये केलेली गुंतवणूक एकूण १.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
याआधी जून महिन्यामध्येही या संस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये २६, ५६५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे दिसून आल्यामुळेच परकीय वित्तीय संस्थांचा भारतीय शेअर बाजारातील विक्रीचा ओढा वाढलेला दिसत आहे.