Upcoming IPO: नव्या वर्षांत अनेक आयपीओ शेअर बाजारात (Share Market IPO) येण्याच्या तयारीत आहेत. २०२१ मध्ये दिसलेल्या तेजीनंतर २०२२ मध्ये कंपन्या आयपीओच्या माध्यमातून १.५ लाख कोटी रुपये जमवण्याच्या विचारात आहेत. याच महिन्यात गौतम अदानी (Gautam Adani) अदानी विल्मर (Adani Wilmar) यांच्यापासून बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया (Ruchi Soya) या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. आयपीओंसाठी २०२१ हे चांगलं वर्ष ठरलं होतं. कोरोना महासाथीच्या (Coronavirus Pandemic) दरम्यान गेल्या वर्षी कंपन्यांनी १.२ लाख कोटी रुपये आयपीओद्वारे जमवले. एलआयसीचा बहुप्रतिक्षीत (LIC IPO) आयपीओदेखील येण्याच्या तयारीत आहे.
अदानी विल्मरचा ४५०० कोटी रुपयांचा आयपीओ याच महिन्यात येणार आहे. तर रुची सोयाचा जवळपास ४३०० कोटी रुपयांचा IPOही याच महिन्यात येणार आहे. गो एअरलाइन्स देखील जवळपास ३६०० कोटी रुपयांचा IPO आणणार आहे. MobiKwik चा १९०० कोटी रुपयांचा IPO देखील याच महिन्यात येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय इएसएएफ स्मॉल फायनॅन्स बँकेचा ९९८ कोटींचा आणि ट्रॅक्शन टेक्नॉलॉजीसचा ५०० कोटी IPO देखील या महिन्यात येणार आहेत. दुसरीकडे, Skanray Technologies चा ४०० कोटी रुपयांचा IPO तसेच ओएएफएस येणार आहे. ईएसडीएस सॉफ्टवेअर लिमिटेडचा ३३२ कोटी रुपयांचा IPO देखील OFS सोबत येणार आहे.
सध्या बाजारात आयपीओसाठी उत्साह दिसून येत असला तरी २०२२ मध्ये तो कमी होई शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. "कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचाही प्रभाव दिसून येईल आणि अशातच अनिश्चितता बाजार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरेल," असं मत प्रभूदास लिलाधरचे उत्पादन प्रमुख पीयूष नागदा यांनी व्यक्त केलं. २०२२ हे वर्ष आयपीओ बाजारासाठी २०२१ प्रमाणे उत्साहानं भरलेलं नसेल. विशेषतः Paytm सारख्या काही मोठ्या कंपन्यांनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर चांगली कामगिरी केली नाही यावरुन हे दिसून येत असल्याचं मत फर्स्ट वॉटर कॅपिटल फंडचे मुख्य प्रायोजक रिकी कृपलानी यांनी व्यक्त केलं.