शेअर बाजाराने यंदा गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस दाखविले आहेत. एकापेक्षा एक अशा कंपन्यांनी आयपीओ आणल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांचीही चांदीच झाली आहे. यंदापेक्षाही जास्त पैसे कमविण्याची संधी पुढच्या वर्षी चालून येणार आहे. कारण एक दोन नाही तर एलआयसीसह ४५ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.
गेल्या तीन महिन्यांत जवळपास 40 कंपन्यांनी बाजार नियामक सेबीकडे IPO साठी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये ओला, बायजू, ओयो यांसारख्या प्रसिद्ध स्टार्टअप्सचा समावेश आहे. जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एलआयसीचा आयपीओ देखील रांगेत आहे. LIC चा IPO 80 हजार ते एक लाख कोटी रुपयांचा असू शकतो असा अंदाज आहे. हा जगभरातील सर्वात मोठ्या IPOमधील एक असणार आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत आयपीओ आणण्याच्या तयारीत असलेल्या कंपन्यांमध्ये गौतम अदानी यांची कंपनी अदानी विल्मरचेही नाव आहे. याशिवाय गो फर्स्ट एअरलाइन्स, ड्रूम टेक्नॉलॉजी, स्नॅपडील या कंपन्याही खुल्या बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. Zomato नंतर आणखी एक फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy देखील IPO आणणार आहे. आगामी काळात, Delhivery, Exigo, MobiKwik, FarmEasy, Navi, Pinelabs इत्यादींचे IPO देखील गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची संधी देऊ शकतात.
या वर्षी जानेवारीपासून एकूण 63 कंपन्या बाजारात आल्या आहेत. या सर्वांनी मिळून बाजारातून सुमारे १.२९ लाख कोटी रुपये उभे केले आहेत. कोणत्याही एका वर्षात आयपीओमधून जमा झालेला हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 2017 मध्ये कंपन्यांनी खुल्या बाजारातून 75 हजार कोटी रुपये उभे केले होते. पेटीएम (रु. 18,300 कोटी), झोमॅटो (रु. 9,375 कोटी) आणि स्टार हेल्थ (रु. 7,249 कोटी) या वर्षीच्या मोठ्या IPO मधील प्रमुख कंपन्या आहेत.