एका झटक्यात या खात्यातून त्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करणारी युपीआय यंत्रणा आज ढेपाळली आहे. काही काळापासून युपीआयवरून पेमेंट करणारे त्रासले असून अनेकांच्या खात्यातून पैसे दोन दोन वेळा वळते झाले आहेत. तर अनेकांना युपीआयद्वारे पेमेंटच करता आलेले नाही. युपीआय सिस्टीम डाऊन झाल्याने ती वापरणारी फोन पे, जी पे, पेटीएमसारखी अॅपही काम करत नाहीएत.
युपीआय पेमेंट सिस्टीम वापरणाऱ्या असंख्य युजर्सनी सोशल मीडियावर याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी युपीआय डाऊन आहे का असे प्रश्न विचारले आहेत, त्यांना अनेकांची हो अशी उत्तरे आली आहेत.
डाऊनडिटेक्टर डेटाने देखील सायंकाळी सात वाजल्यानंतर युपीआय डाऊन झाल्याचे म्हटले आहे. सुमारे १३०० हून अधिक लोकांनी त्यांना याबाबत कळविले आहे. अनेकांना युपीआय स्लो झाल्याचा अनुभव आला आहे. पेमेंट झाले परंतू गोल गोल सर्कल तिथेच फिरत राहिले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची उपकंपनी असलेल्या NPCI BHIM सर्व्हिसेस लिमिटेड (NBSL) ने मंगळवारी भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) अॅपची नवीनतम आवृत्ती - BHIM 3.0 लाँच केली होती, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा फटका बसला आहे.
तुम्ही केलेले पेमेंट झाले नसेल तर ते रिफ्लेक्ट होण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागतो. अनेकदा एखाद्या बँकेला समस्या असेल तेव्हा असे होत असते. परंतू, सरकरट सर्वच युपीआय अॅपवरून पेमेंट करताना ही समस्या येत असल्याने युपीआय सिस्टिमच बंद पडल्याचे बोलले जात आहे. यामुळे जर तुमचे पैसे वळते झाले असतील तर काही काळ वाट पाहून तुम्हाला ते पैसे परत तुमच्या खात्यात येण्याची वाट पहावी लागणार आहे.